दरम्यान, या खासदारांच्या शिष्टमंडळांपैकी डीएमके खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्को येथे दाखल झाले. मात्र हे विमान रशियाच्या हवाई हद्दीत पोहोचताच युक्रेनकडून संपूर्ण शहरावर ड्रोन हल्ले करण्यात आले. अनेक तास युक्रेनचे ड्रोन आकाशातच घिरट्या मारत होते. त्यामुळे भारतीय खासदारांचं हे शिष्टमंडळ धोक्यात आलं होतं. कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या विमानाला लँडींग करायला अडचणी येत होत्या. त्यामुळे हे विमान तब्बल 40 मिनिटं आकाशातच घिरट्या घालत होतं. अखेर धोका टळल्यानंतर विमानाचे लँडिंग करण्यात आले.
advertisement
मॉस्कोपासून जवळपास 400 किलोमीटर दूरवर असलेल्या येलेट्स शहरावर युक्रेनने अनेक ड्रोन्स डागले. या हल्ल्यांचा रशियाच्या तब्बल 153 विमान उड्डाणांवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. मॉस्कोच्या शेरमेत्येवो, डोमोडेडोवो, झुकोवस्की आणि बोनुकोवो या विमानतळांवरील विमान उड्डाणे अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्याचे रशियाच्या रोसावियात्सिया या हवाई सेवा संस्थेने म्हटले आहे.
डीएमके खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ रशिया, स्पेनसह पाच देशांचा दौरा करणार आहे. शुक्रवारी हे शिष्टमंडळ मोस्कोत पोहोचलं. इथं मोस्कोतील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी शिष्टमंडळाचं स्वागत केलं. कनिमोळी यांच्या शिष्टमंडळात राजीव राय, कॅप्टन ब्रिजेश चौटा, प्रेम चंद गुप्ता, अशोक मित्तल आणि राजदूत मंजीव पुरी यांचा समावेश आहे. रशियानंतर हे शिष्टमंडळ स्लोवेनिया, ग्रीस, लातविया आणि स्पेन येथे जाणार आहे. या घटनेनंतर रशियाच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या हवाई संरक्षण दलाने रात्रभर 105 ड्रोन पाडल्याचा दावा केला.