अमेरिका सध्या अत्यंत धोकादायक हिवाळी वादळाच्या तडाख्यात सापडला आहे. जोरदार बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि जीवघेणी थंडी यामुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की आतापर्यंत 6,000 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून लाखो नागरिकांचे प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
17 राज्यांत आणीबाणी जाहीर
या वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील किमान 17 राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. यात अलाबामा, आर्कान्सास, जॉर्जिया, कॅन्सस, केंटकी, लुईझियाना, मेरीलँड, मिसिसिपी, मिसूरी, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलायना, पेनसिल्व्हेनिया, साउथ कॅरोलायना, टेनेसी, टेक्सास, व्हर्जिनिया तसेच वॉशिंग्टन डीसीचा समावेश आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
हजारो मैलांपर्यंत वादळाचा कहर
हे भीषण वादळ सुमारे 1,500 मैलांपर्यंत पसरू शकते, तर काही अंदाजानुसार 2,000 मैलांहून अधिक क्षेत्र त्याच्या प्रभावाखाली येऊ शकते. टेक्सासपासून न्यू इंग्लंडपर्यंत बर्फवृष्टी आणि बर्फाळ वाऱ्यांचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला शून्य अंशाखालील तापमानाचा सामना करावा लागू शकतो.
वॉशिंग्टन डीसीमध्ये ‘स्नो इमर्जन्सी’ लागू करण्यात आली असून स्नो इमर्जन्सी रूटवरून वाहनं हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथे किमान 9 इंच बर्फ पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर फ्रीझिंग रेनमुळे परिस्थिती आणखी धोकादायक होऊ शकते.
दक्षिण भागात सर्वाधिक धोका
वादळाचा सर्वाधिक फटका अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॅलस, लिटल रॉक (आर्कान्सास), मेम्फिस, नॅशव्हिल (टेनेसी), अटलांटाच्या उत्तरेकडील परिसर, शार्लट, रॅली (नॉर्थ कॅरोलायना), रोअनोक (व्हर्जिनिया) आणि वॉशिंग्टन डीसी येथे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आहे.
हवाई वाहतूक ठप्प
हवाई वाहतूक अक्षरशः कोलमडली आहे. शनिवारी 2,836 हून अधिक उड्डाणे रद्द झाली, तर रविवारी आतापर्यंत 3,587 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या एका वर्षातील हा अमेरिकेसाठी सर्वात वाईट रविवार ठरल्याचे सांगितले जात आहे.
रस्ते बंद, वीजखंडित होण्याचा इशारा
राज्य व स्थानिक प्रशासनाने वीजपुरवठा खंडित होणे, पाण्याच्या पाइपलाइन गोठणे आणि रस्ते पूर्णपणे बंद होण्याचा इशारा दिला आहे. भीतीपोटी नागरिकांनी किराणा दुकाने गाठल्याने अनेक ठिकाणी काही तासांतच शेल्फ रिकाम्या झाल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही बर्फवृष्टी 1993 मधील ‘सुपरस्टॉर्म’नंतरची अमेरिकेतील सर्वात मोठी आणि धोकादायक घटना ठरू शकते. अनेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे आधीच बंद करण्यात आली आहेत. टेक्सासमध्ये परिस्थिती सर्वाधिक नाजूक असून पाच वर्षांपूर्वी आलेल्या प्राणघातक थंडीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत असून, त्यामुळे परिस्थितीची गंभीरता आणखी ठळक होत आहे.
