अमेरिका-इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे सांगण्यात आले. शस्त्रसंधीच्या या ऐतिहासिक घटनेच्या आनंदात सहभागी होण्याच्या नादात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी फजिती झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शहबाज शरीफ यांनी केलेले एक ट्विट सध्या जगभरात चर्चेचा आणि थट्टेचा विषय बनले आहेत. पाकिस्तानचे धोरणात्मक निर्णय बाहेरील शक्तींकडून (विशेषतः अमेरिका) घेतले जातात का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणला दिलेली डेडलाईन वाढवण्याचे आणि मुत्सद्देगिरीसाठी वेळ देण्याचे आवाहन करणारे एक ट्विट केले होते. मात्र, युझर्सनी या ट्विटची 'एडिट हिस्ट्री' तपासली असता एक धक्कादायक बाब समोर आली. शहबाज शरीफ यांनी जे मजकूर पोस्ट केला होता, त्याच्या अगदी वर "Draft - Pakistan’s PM Message on X" (ड्राफ्ट - X वर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा संदेश) असे लिहिले होते.
ट्रम्प यांच्या टीमकडून आला मजकूर?
या एका ओळीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शहबाज शरीफ यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सामान्यतः कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांची टीम स्वतःसाठी मजकूर तयार करताना "पाकिस्तानचे पंतप्रधान" असा उल्लेख ड्राफ्टमध्ये करत नाही. त्यामुळे हा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आला होता आणि शहबाज शरीफ यांनी तो न वाचता, 'ड्राफ्ट'च्या ओळीसह जसाच्या तसा कॉपी-पेस्ट केला, असा दावा केला जात आहे. फजिती होत असल्याचे लक्षात येताच शरीफ यांच्या टीमने तातडीने ट्विट एडिट करून ती ओळ हटवली, पण तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.
पाकिस्तानचं ढोंग उघडं पडलं...
या घटनेने भू-राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. पाकिस्तानचे राजनैतिक निर्णय अनेकदा बाह्य शक्तींच्या प्रभावाखाली असतात. अमेरिकेने दोन आठवड्यांचा सीजफायर जाहीर केला आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास मान्यता दिली, हे सर्व शहबाज शरीफ यांच्या आवाहनानंतर घडल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, या 'कॉपी-पेस्ट' प्रकरणाने पाकिस्तानच्या मुत्सद्देगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे
