अमेरिकन साउदर्न कमांडने सोशल मीडियावर स्पष्ट केले की संबंधित बोट ‘नार्को-ट्रॅफिकिंग ऑपरेशन’मध्ये सक्रिय होती. हल्ल्यानंतर बचावकार्य राबवण्यासाठी अमेरिकन कोस्ट गार्डला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले.
क्षणात आगगोळा बनलेली बोट
लष्कराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ही बोट समुद्रात वेगाने जाताना दिसते आणि काही सेकंदांतच ती भीषण स्फोटात आगगोळ्यात रूपांतरित होते. हल्ल्यानंतर वाचलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
advertisement
ड्रग तस्करीविरोधी मोहिमेतील 36वा हल्ला
हा हल्ला अमेरिकेच्या समुद्री ड्रग तस्करीविरोधी व्यापक मोहिमेचा भाग आहे. या मोहिमेत आतापर्यंत दक्षिण अमेरिकेच्या सागरी हद्दीत किमान 36 हल्ले करण्यात आले असून त्यामध्ये 117 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातील बहुतांश कारवाया कॅरिबियन समुद्र परिसरात झाल्या आहेत.
डिसेंबरमध्ये पाच हल्ले
डिसेंबर महिन्यातही अमेरिकेने ड्रग तस्करीत गुंतलेल्या पाच बोटींवर कारवाई केली होती. त्या कारवायांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या होत्या. काही दिवसांनंतर कोस्ट गार्डने शोधमोहीम थांबवली होती.
याआधी 3 जानेवारी रोजी व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे अमेरिकन लष्कराने मोठी कारवाई करत अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कला नेण्यात आले असून त्यांच्यावर संघीय ड्रग तस्करीचे आरोप दाखल करण्यात आले आहेत.
ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांमुळे समुद्री ड्रग तस्करी मार्गांवर मोठा आघात बसल्याचा दावा केला आहे. पाण्याच्या मार्गाने होणाऱ्या जवळपास 100 टक्के ड्रग तस्करीवर आळा बसवण्यात यश आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही कारवाई व्हेनेझुएलाशी संबंधित तेल टँकरांवरील जप्ती आणि ड्रग तस्करी मार्गांवर नजर ठेवण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचेही सांगितले जात आहे.
