सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, 'आम्ही फोर्डो, नतान्झ आणि एस्फहानसह इराणमधील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला. आमची सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत. पहिलं टार्गेट असलेल्या फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला. सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचं अभिनंदन. जगात असं दुसरे कोणतंही सैन्य नाही, जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे.'
advertisement
डोनाल्ड ट्रम्प भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता भाषण करतील. यात ट्रम्प हल्ल्याबाबतचा अधिकचा तपशील देण्याची शक्यता आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी कबूल केले की हा हल्ला स्थानिक वेळेनुसार पहाटे २:३० वाजता झाला. फोर्डो अणुस्थळ जमिनीखाली आहे. मात्र तरीही हे अणुस्थळ नष्ट करण्यात अमेरिकेला यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे.
ट्रम्प यांनी फोर्डोबद्दल लिहिले की, फोर्डो नष्ट झाला आहे. इराणी शहर गहोमजवळील डोंगराळ प्रदेशात असलेले फोर्डो अणुस्थळ नेहमीच अमेरिका, इस्रायल आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रडारवर राहिलं आहे. २००९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा या अणुस्थळाची माहिती उघड झाली, तेव्हा जगाला कळले की इराणने ते ६० ते ९० मीटर खोल जमीनीत हे अणुस्थळ लपवलं होतं. असं मानलं जातं आहे की येथे ३,००० पर्यंत युरेनियम समृद्धीकरण सेंट्रीफ्यूज बसवले गेले आहेत.
बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सने हल्ला
सध्या ट्रम्प यांनी हल्ला कसा केला? याची स्पष्ट माहिती दिली नाही. परंतु अमेरिकन संरक्षण खात्यातील सूत्रांनुसार, या मोहिमेत अत्याधुनिक बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. ही तीच विमाने आहेत जी ३०,००० पौंड वजनाचे GBU-५७ बॉम्ब वाहून नेऊ शकतात. जे विशेषतः जमीनीत खोलवर लपून ठेवलेल्या टार्गेटला नष्ट करण्यासाठी उपयोगी ठरतात. फोर्डो अणुस्थळ नष्ट करण्यासाठी हा बॉम्ब वापरला गेला असावा, असा दावा आता केला जात आहे. कारण फक्त हाच बॉम्ब इतक्या खोलवर हल्ला करू शकतो.