मुंबई: ऑफिसमधून सुट्टी घ्यायची असेल आणि हाताशी ठोस कारण नसेल, तर बहुतांश लोक “सर, आज तब्येत ठीक नाही”, “ताप आला आहे” अशी कारणे सांगून सुट्टी मागतात. सकाळी 9 वाजता बॉसला मेसेज करण्याआधी शंभर वेळा विचार केला जातो. मात्र बदलत्या काळासोबत कॉर्पोरेट जगातील कामाची संस्कृती आणि पद्धत बदलत आहे. याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक ईमेल होय.
advertisement
एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसकडे सुट्टी मागताना कोणतेही खोटे कारण दिले नाही, तर थेट आणि प्रामाणिकपणे सांगितले की त्याला आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवायचा आहे. या प्रामाणिकपणावर बॉसने दिलेली प्रतिक्रिया सध्या लोकांची मने जिंकत आहे. या घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. अनेक जण वर्क कल्चर बदलल्याचे सांगत ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.
ईमेलमध्ये नेमकं काय लिहिलं होतं?
या ईमेलचा विषय होता: 16 डिसेंबरसाठी सुट्टीची विनंती.
ईमेलमध्ये कर्मचारी लिहितो, “हाय सर, मी 16 डिसेंबरला सुट्टी हवी आहे. माझी गर्लफ्रेंड 17 तारखेला आपल्या घरी उत्तराखंडला जाणार आहे आणि ती जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत परत येणार नाही. त्यामुळे तिच्या जाण्याआधी मला तो दिवस तिच्यासोबत घालवायचा आहे. कृपया सुट्टी मिळेल का, याबाबत कळवा.”
या ईमेलमध्ये कर्मचाऱ्याने कुठलाही बनाव किंवा औपचारिक शब्दांचा अतिरेक न करता थेट मनातली गोष्ट सांगितली होती.
मॅनेजरने कर्मचाऱ्याचे केले कौतुक
सामान्यतः अशा प्रकारचा ईमेल पाहून अनेक बॉस चिडू शकतात किंवा तो ‘अनप्रोफेशनल’ असल्याचे म्हणू शकतात. मात्र या प्रकरणात मॅनेजर वीरेन खुल्लर यांनी कर्मचाऱ्याची ही वेगळी सुट्टीची मागणी केवळ मंजूरच केली नाही, तर त्याच्या प्रामाणिकपणाची उघडपणे प्रशंसाही केली. त्यांनी 15 डिसेंबर रोजी हा ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. ज्याला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
प्रेमाला ‘नाही’ कसं म्हणणार?
हा स्क्रीनशॉट शेअर करताना मॅनेजरने लिहिले, “आज मला हे माझ्या इनबॉक्समध्ये मिळाले. दहा वर्षांपूर्वी असाच मेसेज सकाळी 9.15 वाजता अचानक ‘सिक लीव्ह’च्या बहाण्याने आला असता. पण आज हा आधीच पाठवलेला, पारदर्शक आणि प्रामाणिक सुट्टीचा अर्ज आहे. काळ बदलत आहे. आणि खरं सांगायचं तर मला ही पद्धत जास्त आवडते. आपण प्रेमाला नाही कसे म्हणू शकतो? सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.”
कमेंट सेक्शनमध्ये रंगली जोरदार चर्चा
ही पोस्ट व्हायरल होताच लोक दोन गटांत विभागले गेले. अनेकांनी मॅनेजरच्या उदार वृत्तीचे आणि बदलत्या वर्क कल्चरचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, “हीच खरी लीडरशिप आहे. जेव्हा बॉस आणि कर्मचारी यांच्यात विश्वास असतो, तेव्हा खोटं बोलण्याची गरजच पडत नाही.”
मात्र काही लोकांनी यावर गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केला. एका युजरने म्हटले, “सुट्टीसाठी इतकं स्पष्टीकरण देण्याची गरजच का असावी? हेल्दी वर्क कल्चरमध्ये फक्त ‘पर्सनल लीव्ह’ सांगणे पुरेसे असायला हवे. मी गर्लफ्रेंडला भेटतोय की कुत्र्याला फिरवतोय, हे बॉसला सांगण्याची गरज नाही.” या चर्चेमुळे ऑफिसमधील वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्याच्या सीमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
