चला जाणून घेऊया पहिल्यांदा विमानाने प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
1. तिकिट बुकिंगपासून सुरुवात करा
विमान प्रवासाची पहिली पायरी म्हणजे तिकिट बुकिंग. तुम्ही थेट विमान कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा MakeMyTrip, Cleartrip, EaseMyTrip सारख्या ट्रॅव्हल अॅप्सद्वारे ऑनलाइन तिकिट घेऊ शकता. बुकिंग झाल्यावर तुमचं बोर्डिंग पास डाउनलोड करा आणि फोनमध्येच ठेवा किंवा प्रिंट काढा आणि त्यासोबत ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट) तयार ठेवा.
advertisement
2. विमानतळावर जाण्यापूर्वी तयारी
विमान कंपनीनुसार बॅगेज अलाऊन्स वेगवेगळा असतो. साधारणपणे ७ किलो हातातील बॅग आणि १५ ते २० किलो चेक-इन सामान नेण्याची परवानगी असते. हातातील बॅगेत धारदार वस्तू, मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ किंवा परफ्यूम ठेवू नका. तज्ज्ञांच्या मते, फ्लाइट सुटण्याच्या 2 ते 3 तास आधी विमानतळावर पोहोचणं उत्तम ठरतं.
विमानतळात प्रवेश करताना सुरक्षारक्षकांना आपलं ओळखपत्र दाखवा. त्यानंतर तुमच्या विमान कंपनीच्या चेक-इन काउंटरवर जा किंवा सेल्फ सर्व्हिस किऑस्क वापरून बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग घ्या. कर्मचारी तुम्हाला गेट नंबर आणि बोर्डिंग टाइम सांगतील.
3. सुरक्षा तपासणी (Security Check)
यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी जावं लागतं. या ठिकाणी तुमच्या बॅगा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बेल्ट, शूज इत्यादी वस्तू एक्स-रे ट्रेमध्ये ठेवाव्या लागतात. तुम्ही मेटल डिटेक्टरमधून जाता, आणि लायटर, ब्लेड, कात्रीसारख्या वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात. तपासणी झाल्यावर पुन्हा बोर्डिंग पास आणि आयडी तपासला जातो. त्यानंतर प्रवासी ड्युटी-फ्री शॉप्स किंवा लाउंजमध्ये थांबू शकतात.
4. बोर्डिंग गेटकडे प्रस्थान
तुमच्या बोर्डिंग पासवर गेट नंबर आणि बोर्डिंग टाइम दिलेला असतो. उड्डाणाच्या किमान ३० मिनिटे आधी गेटवर पोहोचणं आवश्यक आहे. विमान कंपनीचे कर्मचारी बोर्डिंगची घोषणा करतील आणि प्रवाशांना सीट नंबर किंवा झोननुसार आत घेतलं जाईल.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी या टप्प्यावर पासपोर्ट कंट्रोल आणि इमिग्रेशन तपासणी देखील केली जाते.
5. विमानात बसल्यानंतर
प्रवासी विमानात एअरब्रिज किंवा बसद्वारे प्रवेश करतात. केबिन क्रू तुम्हाला जागा दाखवतात आणि हातातील बॅग ओव्हरहेड बिनमध्ये ठेवण्यास मदत करतात.
विमान उड्डाण करण्यापूर्वी सीटबेल्ट लावा, सेफ्टी इन्स्ट्रक्शन ऐका आणि मोबाईल फोन एअरप्लेन मोडमध्ये ठेवा.
क्रू सदस्य सर्व प्रवासी तयार असल्याची खात्री करून विमान उड्डाण करते.
थोडी तयारी, अधिक आरामदायी प्रवास
पहिल्यांदा विमानाने प्रवास करत असाल, तर या काही सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा हवाई प्रवास अधिक स्मूद, आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण होईल.