व्हिडिओमध्ये नेमकं दिसतंय काय?
हा व्हिडिओ अमृत भारत एक्सप्रेस (16601) ट्रेनचा असल्याचं सांगितलं जातं. यात एक व्यक्ती रेल्वेमध्ये वापरले जाणारे डिस्पोजेबल फूड कंटेनर धुवून पुन्हा वापरताना दिसतो. हा व्हिडिओ काँग्रेस नेते श्रीनिवास बी. व्ही. यांनी शेअर करत रेल्वे मंत्र्यांवर टीका केली “प्रवाशांकडून पूर्ण भाडं आकारता, पण अशी लाजिरवाणी कृती? तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असं कॅप्शन त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं.
advertisement
या घटनेनंतर रेल्वेत दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या स्वच्छतेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.
IRCTCची तत्काळ कारवाई
सुरुवातीला रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. पण व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यावर IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) ने कारवाई केली. IRCTCने सांगितलं की, संबंधित वेंडरची ओळख पटवली आहे आणि त्याला तत्काळ सेवेतून हटवण्यात आलं आहे. त्याचा लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यावर मोठा दंडही ठोठावला गेला आहे.
प्रवाशांचा संताप आणि सोशल मीडियावरील चर्चा
व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप केला. काहींनी म्हटलं “रेल्वे पूर्ण भाडं घेतं पण स्वच्छतेबाबत बेफिकीर आहे.” तर दुसऱ्यांनी प्रश्न विचारला, “हे पहिल्यांदाच नाही, आपली मानसिकता बदलायला हवी.”
वाद वाढल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या प्रकरणावर फॅक्ट चेक जारी केला. PIBने सांगितलं की हा व्हिडिओ भ्रामक आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे कंटेनर प्रवाशांना अन्न देण्यापूर्वी नव्हे, तर डिस्पोजलपूर्वी साफ केले जात होते. म्हणजेच ते पुन्हा वापरले जात नव्हते.
तरीही, अनेक यूजर्सनी प्रश्न विचारला “जर हे कंटेनर वापरून झाल्यावर टाकायचे असतील, तर त्यांना धुण्याची गरजच काय?” या प्रश्नावरून अजूनही चर्चा सुरू आहे.
