ही घटना छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाडच्या पांगूड जंगलात घडली आहे. एका स्थानिक ग्रामस्थाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये टिपली आणि ती सोशल मीडियावर शेअर केली. व्हिडीओत दिसतं की, एक वाघ हळूहळू अस्वलाच्या पिलाकडे सरकत आहे आणि तेव्हा झाडीतून अचानक मादी अस्वल बाहेर येते आणि वाघाच्या समोर उभी ठाकते.
वाघाने अस्वलाच्या पिलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आधीच मादी अस्वल पूर्ण ताकदीनिशी समोर आली. त्यानंतर दोघांमध्ये तगडा संघर्ष सुरू झाला. मादी अस्वल धैर्याने वाघाशी लढली. अखेर एका मातेच्या साहसापुढे वाघाला माघार घ्यावी लागली.
advertisement
झालं काय की, मादी अस्वल आपल्या पिलाला तोंडात धरून तिथून दूर निघून गेली. हा क्षण केवळ निसर्गाचा ताकद दाखवणारा नव्हता, तर ‘आई’ या शब्दाचा खरा अर्थ सांगणारा ठरला.
छत्तीसगडचे वनमंत्री केदार कश्यप यांनीही हा व्हिडीओ X (माजी ट्विटर) वर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं, "आई म्हणजे आईच असते. पांगूडमध्ये नवीन रस्त्याचं काम सुरू असताना आई अस्वल आपल्या पिलाला वाचवण्यासाठी वाघाशी भिडली. आईच्या ममतेसमोर वाघालाही माघार घ्यावी लागली."
या घटनेबाबत वन विभागाने माहिती दिली की, मादी अस्वल आणि तिचं पिलू दोघंही सुरक्षित आहेत. वाघालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. भांडणानंतर सर्व प्राणी आपापल्या मार्गाने निघून गेले.
नेटिझन्सच्या मनात घर करणारा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावूक झाले असून आईच्या ममतेचं हे दृश्य लोकांच्या मनाचा ठाव घेतंय. माणूस असो की प्राणी, आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही संकटासमोर उभी राहू शकते, हे या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसून आलं आहे.