प्रसिद्ध पाकिस्तानी-ब्रिटिश टिकटॉकर आणि कंटेंट क्रिएटर महक बुखारी इंग्लंडमधल्या स्टॅफोर्डशायर इथे तिचे वडील रजा अली, आई अनसरीन आणि तिच्या धाकट्या भावासह राहत होती. वयाच्या 18 वर्षी तिने टिकटॉकच्या माध्यमातून जगभरात ओळख मिळवली होती.
मेकअप, स्टायलिंग आणि लक्झरी लाइफवर महक व्हिडिओ बनवत होती. लाखो जणांना तिचे व्हिडिओ आवडत होते. त्यामुळे तिला सोशल मीडिया स्टार अशी ओळख मिळाली. वाढत्या लोकप्रियतेमुळे महकने पदवीचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि ती पूर्ण वेळ कंटेंट क्रिएटर बनली. ब्रँड प्रमोशन आणि इव्हेंटमध्ये सहभागी होऊन ती चांगले पैसे कमावू लागली. 2022 पर्यंत महकला जगभरात ओळख मिळाली. याचदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली. दुहेरी हत्याकांडात महकला दोषी ठरवण्यात आलं आणि न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिच्या जीवनातल्या या धक्कादायक बदलाला तिची आई कारणीभूत ठरली.
advertisement
2021 मध्ये महकला तिची आई चिंतेत असल्याचं दिसत होतं. महकने तिची आई अनसरीन बुखारीला चिंतेचं कारण विचारलं; पण तिनं सांगितलं नाही. आईच्या चेहऱ्यावरची चिंता महकला अस्वस्थ करत होती. शेवटी महकने आईवर दबाव टाकून सत्य जाणून घेतलं. महकच्या दबावामुळे तिच्या आईने अखेर तिच्या अनैतिक संबंधांची माहिती महकला दिली. 46 वर्षांच्या अनसरीनने महकला सांगितलं, की 2019 पासून तिचे 21 वर्षांच्या साकिब हुसेनशी अफेअर सुरू आहे.
अनसरीनचा ऑनलाइन चॅटिंग ॲपच्या माध्यमातून साकिबशी संवाद सुरू झाला. दीर्घ काळ संवादानंतर ते एकमेकांना आवडू लागले. संवादादरम्यान आपण 27 वर्षांचा असल्याचं साकिबने सांगितलं; पण त्याचं खरे वय 21 वर्षं होतं. दुसरीकडे अनसरीन विवाहित होती आणि तिला 23 वर्षांची मुलगी होती. त्या दोघांच्या वयातलं अंतर जास्त होतं; पण या गोष्टींचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. काही दिवस चॅटिंग केल्यावर ते एकमेकांना भेटू लागले. पती राजपासून ही गोष्ट लपवून ठेवून अनसरीन सुमारे दोन वर्षं साकिबला भेटत होती.
2021 मध्ये अनसरीनला हे अनैतिक नातं फार काळ लपवून ठेवता येणार नाही, याची जाणीव झाली. पतीच्या भीतीमुळे तिने साकिबला नातं तोडण्याविषयी सांगितलं; पण साकिब प्रेमात आकंठ बुडाला होता. त्याने नातं तोडण्यास नकार दिला. अनसरीनने हे नातं कायम ठेवता येणार नाही, असं सांगताच साकिबने काही खासगी फोटो तिला पाठवण्यास सुरुवात केली. ब्रेकअपविषयी बोलताच साकिब वारंवार अनसरीनला ब्लॅकमेल करू लागला. तसंच दोघांचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ पतीला पाठवण्याची धमकी देत होता. त्यामुळे अनसरीन त्रस्त होती.
BIGG BOSS 18: फायनलिस्ट तर लांबच, टॉप 10 मध्येही पोहचली नाही ॲलिस कौशिक, मोठी रक्कम घेऊन पडली बाहेर
आईची समस्या ऐकून महकने हे प्रकरण संपवण्याचा निर्णय घेतला. नंतर तिनं एक कट रचला. आईची या प्रकारातून सुटका करण्यासाठी महकने तिचा मेकॅनिक मित्र रेकान कारवानकडे (वय 27) मदत मागितली. तो त्याच्यासोबत रईस जमान (वय 23), नताशा अख्तर (वय 23), अमीर जमाल (वय 28) आणि सनफ गुलमुस्तफा (वय 23) यांनादेखील घेऊन आला.
प्लॅननुसार अनसरीनने साकिबला भेटायला बोलवायचं असं ठरलं. तो आल्यावर सर्व जण त्याच्यावर दबाव टाकून त्याला फोनमधले प्रायव्हेट फोटो डिलीट करायला लावणार होते. प्लॅननुसार, अनसरीनने साकिबला कॉल करून सांगितलं, की "तू दोन वर्षांत आपल्या रिलेशनशिपमध्ये जे 3000 पौंड खर्च केले आहेस ते मला परत द्यायचे आहेत." हे ऐकून साकिब भेटायला तयार झाला. लिसेस्टरमधल्या एका बागेत भेटायचं ठरलं. यासाठी साकिबने त्याचा बालपणीचा मित्र मोहम्मद हाशिम ऐजाजुद्दीन याला सोबत येण्यास तयार केलं. आपला मित्र ब्लॅकमेलिंगमध्ये सहभागी आहे हे हाशिमला माहिती नव्हतं. त्याने कोणतीही चौकशी न करता सोबत येण्यास होकार दिला.
साकिब रात्री उशिरा मित्रासह लिसेस्टरमधल्या बागेत पोहोचला. काही वेळाने अनसरीन आणि तिची मुलगी महक बुखारी तिथे पोहोचल्या. मग अनसरीनने साकिबला फोनमधले फोटो डिलीट करण्यास सांगितलं. साकिब संतापला. आपल्याला भेटायला बोलवण्यासाठी 3000 पौंड देण्याचा बहाणा करण्यात आल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्या वेळी महक आणि साकिबमध्ये झटापट झाली. हे पाहून त्यांचे मित्र कारमधून उतरू लागले. धोका लक्षात येताच साकिब लगेच कारमध्ये बसून पळून जाऊ लागला. साकिबला अडवण्यासाठी महक आणि तिचे मित्र कारचा पाठलाग करू लागले. पाठलाग सुरू असताना घाबरून त्याने 999 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून मदत मागितली. "दोन कार वेगात पाठलाग करत आहेत, तसंच त्यांनी तोंड झाकले असून ते आपल्या कारवर हल्ला करत आहेत," असं सांगितलं.
साकिब आणि पोलिसांचा हा कॉल पाच मिनिटं सुरू होता. पोलीस त्याचं लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. साकिब फोनवर मदत मागत होता. अचानक पोलिसांना किंकाळी ऐकू आली आणि कॉल कट झाला. 11 फेब्रुवारी 2022 रोजी ही घटना घडली. त्या दिवशी रात्री सुमारे दीड वाजता एका रिकव्हरी ड्रायव्हरने नजीकच्या पोलीस स्टेशनला कॉल करून सांगितलं, की A46 डबल कॅरिजवे रोडवर एक कार जळताना सापडली आहे. कार पूर्णपणे जळली होती. त्यात दोन तरुणांचे मृतदेह जळत होते. पोलिसांनी अग्निशामक दलाला बोलवून आगीवर नियंत्रण मिळवले. हे मृतदेह काही वेळापूर्वी 999 क्रमांकावर मदत मागणाऱ्या व्यक्तींचं असल्याचं तपासात स्पष्ट झालं. पोलिसांनी डेंटल रेकॉर्डच्या मदतीने साकिब आणि हाशिमची ओळख पटवली आणि आरोपींचा शोध सुरू केला. त्या मार्गावरचे सीसीटीव्ही तपासले असता या दोघांच्या कारचा एक स्कोडा आणि एक ऑडी कार पाठलाग करत असल्याचं दिसलं. दोन्ही कार्स ताशी 100 किलोमीटर वेगाने धावत होत्या.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्टरच्या मदतीने रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना ऑडीचं लोकेशन सापडलं. मिडलँड पोलिसांच्या मदतीने त्यांनी ऑडी कार एका पेट्रोल पंपावर रोखून धरली. त्यात महकची मैत्रीण नताशा होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिने काही वेळेपूर्वी तिचा मित्र रईसला फोन केल्याचं निष्पन्न झाले. नताशाची अटक या प्रकरणात महत्त्वाची ठरली. चौकशीत नताशाने सांगितलं, की ती महक आणि काही मित्रांसोबत शीशा लाँजला गेली होती; पण प्लॅन कॅन्सल झाल्याने परतली. तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीमुळे प्रकरणाचा पर्दाफाश झाला. महक, अनसरीन आणि त्यांचे 6 साथीदार वेगवेगळ्या कारमधून प्रवास करत असल्याचं पोलीस तपासात आढळलं. साकिबच्या कारला आग लागल्यानंतर ते सर्व त्याच रस्त्याने पुढे निघून गेले. एक कार नताशा, तर दुसरी कार रेकान चालवत होता. काही वेळाने महक ऑडी चालवू लागली आणि नताशा तिच्या जवळच्या सीटवर बसली. काही अंतर जाऊन त्यांनी यू-टर्न घेतला आणि त्या शहरात परतू लागल्या.
रस्त्याच्या कडेला साकिबची कार जळत असताना हे सगळे दुसऱ्या बाजूने निघून गेले. शहरात पोहोचताच त्यांनी कार थांबवून रस्त्यावर फिरायला सुरुवात केल्याचं सीसीटीव्हीत दिसलं. महक आणि अनसरीन त्यांच्या घरी आल्या आणि झोपून गेल्या. नताशा बर्मिंघमला रवाना झाली. रस्त्यात तिला अटक झाली. दुसऱ्या दिवशी पोलीस महकच्या घरी पोहोचले. पोलीस येताच महकने तिचा फोन पाहिला. त्यावर रईसचे अनेक मिस्ड कॉल आले होते. रईसशी फोनवर बोलल्यावर महकने तिच्या आईला मेसेज करून पोलिसांना काय खोटं सांगायचं ते सांगितलं. महक आणि अनसरीनने पोलिसांना खोट्या कहाण्या ऐकवल्या. पण सीसीटीव्हीच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी दोघींना त्यांच्या साथीदारांसह अटक केली. महकने सांगितलं, की साकिब आणि त्याच्या मित्राचा मृत्यू कार अपघातात झाला. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
BIGG BOSS च्या 'शेर खान' ची CANCER मुळे झाली वाईट अवस्था, सलमानला पाहून ढसाढसा रडली, VIDEO
न्यायालयात महक बुखारी आणि तिच्या आईसह सहा जणांविरुद्ध हत्येचा खटला दाखल केला गेला. त्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या मोहम्मद पटेलला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. कारण तो माफीचा साक्षीदार बनला.
अटकेनंतर मोहम्मद पटेलने सांगितलं, की हे लोक सुरुवातीला फोटो डिलीट करू इच्छित होते. पण कारचा पाठलाग करताना रईस आणि रेकान यांच्यात सातत्याने कॉलवर संवाद सुरू होता. त्यात ते साकिबला कारने चिरडण्याचा प्लॅन आखत होते. त्यात महक आणि अनसरीन सहभागी होत्या. महक आणि रेकानच्या कारने साकिबच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कार झाडावर धडकली आणि तिचा स्फोट झाला.
सुमारे 11 महिने चाललेल्या सुनावणीनंतर 4 ऑगस्ट 2023 रोजी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने साकिब आणि हाशिमच्या हत्या प्रकरणी दोषी ठरवून महकला 31 वर्षं आठ महिने, अनसरीनला 26 वर्षं 9 महिने, रेकान आणि रईसला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नताशाला 11 वर्षं, अमीर जमालाला 14 वर्षं आणि गुलमुस्तफाला 14 वर्षं 9 महिन्यांची शिक्षा सुनावली.