इंस्टाग्रामवरील एका रीलने भारतात रविवार सुट्टीची सुरुवात कशी झाली याविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. आणि आश्चर्य म्हणजे ही स्टोरी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संघर्षाशी जोडलेली आहे. लोखंडे हे एक मजूर नेते होते. ज्यांनी बॉम्बेच्या गिरणी कामगारांसाठी आवाज उठवला होता. या रीलमध्ये इतिहास आणि कथाकथन यांचा सुरेख संगम आहे. यात सांगितले आहे की, जरी ब्रिटिश अधिकाऱ्यांना 1843 पासून रविवारी सुट्टी मिळत होती. तर भारतीय कामगारांना आठवड्याच्या सातही दिवसांत काम करावे लागत होते.
advertisement
पण 1883 मध्ये ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. लोखंडे यांनी गिरणी कामगारांसाठी आठवड्यातून एक सुट्टी असावी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या मागण्या सात वर्षे सतत फेटाळल्या गेल्या. पण त्यांनी हार मानली नाही. अखेर त्यांच्या चिकाटीला यश आले. 1890 पर्यंत गिरणी कामगारांना रविवारी आठवड्याची सुट्टी मान्य झाली. आणि नंतर हळूहळू इतर व्यवसायांनाही त्याचे अनुकरण केले.
आज बहुतांश भारतीयांना रविवारी सुट्टी असते — ही एक चैन, जिचे मूळ त्या संघर्षात आहे. आणि हीच गोष्ट या रीलमध्ये प्रभावीपणे दाखवली आहे. ही इतिहासाची अशी एक गोष्ट आहे जी आपल्या शालेय अभ्यासक्रमात क्वचितच शिकवली जाते.
हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मातील विश्रांतीचा अर्थ
न्यू इंडियन एक्सप्रेसमधील एका मतलेखात स्पष्ट करण्यात आलं आहे की- रविवारी सारखी निश्चित आठवड्याची सुट्टी ही संकल्पना प्रामुख्याने ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम अशा अब्राहमिक धर्मांमधून आलेली आहे. ज्यांच्यात विशिष्ट दिवशी उपासना आणि विश्रांती यासाठी दिन निश्चित केलेले असतात.
याच्या उलट, हिंदू, जैन आणि बौद्ध या भारतीय परंपरांमध्ये वेळेचे गणित वेगळे होते. सात दिवसांच्या निश्चित आठवड्याऐवजी चंद्राच्या गणनेवर आधारित दिनचर्या होती. सण काही दिवस चालत आणि कृषी चक्रांशी जोडलेले असत. ज्यामुळे श्रमांनंतर विश्रांती मिळायची. एकादशीसारखे दिवस उपवास आणि प्रार्थनेसाठी राखले जायचे. पण सगळ्यांनी सामूहिकपणे पाळावं असा एकच विश्रांतीचा दिवस नव्हता.
या लेखात म्हटले आहे की, बौद्ध धर्मातील उपोसथ दिवस — ध्यान आणि शुद्धीकरणाचा दिवस — रविवारीच पाळायचा असा नियम नव्हता. श्रीलंकेत तो पौर्णिमा व अमावास्येला पाळला जायचा, तर आग्नेय आशियामध्ये तो अधिक नियमित झाला पण तरीही रविवारीसारखा सर्वसामान्य सामाजिक दिवस कधीच झाला नाही.
ब्रिटिशांनी 1840 च्या दशकात कार्यालये, कारखाने आणि शैक्षणिक संस्थांमध्ये रविवारी सुट्टी लागू केली. मात्र सर्वसामान्य भारतीय कामगारांवर याचा परिणाम अनेक दशके झाला नाही. भारतात औद्योगिकीकरण सुरू झाल्यानंतरच — जसं की फॅक्टरी अॅक्ट 1881 आणि 1891 — साप्ताहिक सुट्ट्या औपचारिकपणे लागू करण्यात आल्या.
म्हणून पुढच्या वेळी तुम्ही रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत असाल, कॉफी प्यायला किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करत असाल — तर नारायण मेघाजी लोखंडेंना यांचे आभार मानायला विसरू नका. त्यांनी विश्रांतीच्या स्वप्नाला आपल्या अधिकारात बदललं.