ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजता घडली, पोलिसांनी आरोपी राइडरविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपीचं नाव लोकेश असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राइडदरम्यानचा धक्कादायक अनुभव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती चर्च स्ट्रीटवरून आपल्या पीजीकडे परतत होती. प्रवासादरम्यान अचानक रॅपिडो चालक लोकेशने बाईक चालवत असतानाच तिच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला युवतीला काय होतंय हेच कळलं नाही, पण जेव्हा राइडरने पुन्हा असंच केलं तेव्हा तिने घाबरून म्हणाली, “भैया, मत करो...” पण ती अनोळखी परिसरात असल्याने तिने लगेच बाइक थांबवली नाही.
advertisement
घटनेनंतर युवतीने आपला अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला. तिने लिहिलं, “मी खूप घाबरले होते, मला स्वतःला पूर्णपणे असुरक्षित वाटलं. मी फक्त एवढंच इच्छिते की कोणत्याही मुलीला असा अनुभव कधी येऊ नये. मग ती कॅबमध्ये असो वा बाईकवर.” तिने पुढे सांगितलं की, असं वर्तन तिला आधीही अनुभवायला मिळालं होतं, पण या वेळी तिने गप्प न राहता आवाज उठवायचं ठरवलं. तिची पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आणि पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली.
घटनेनंतर युवती आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्यावर एका प्रवाशाने तिच्या चेहऱ्यावरचा ताण पाहून विचारपूस केली. संपूर्ण गोष्ट समजल्यानंतर त्याने राइडरला सामोरे जात विचारले असता, आरोपीने माफी मागितली. मात्र जाताना त्याने हाताने इशारा करून दाखवला, ज्यामुळे युवती अजूनही घाबरली. पोलिसांनी विल्सन गार्डन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.
