या सणाशी जोडलेल्या या दोन सर्वात मोठ्या परंपरांमागे एक अतिशय रंजक आणि प्रेरणादायी इतिहास दडलेला आहे.
कोण होता खरा 'सांता क्लॉज'?
आज आपण जो सांता क्लॉज पाहतो, तो आधुनिक जाहिरातींनी बनवलेला एक चेहरा आहे. मात्र, सांता क्लॉज हे पात्र एका खऱ्या व्यक्तीवर आधारित आहे, ज्यांचे नाव होते 'सेंट निकोलस'.
चौथ्या शतकातील कथा: सेंट निकोलस यांचा जन्म चौथ्या शतकात तुर्कीमधील मायरा (Myra) येथे झाला होता. ते एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते, पण त्यांचे मन अतिशय दयाळू होते.
advertisement
सेंट निकोलस यांना लोकांना मदत करायला खूप आवडायचे, पण आपली ओळख कोणाला कळू नये असं त्यांना वाटायचं. म्हणून मग ते रात्रीच्या वेळी गरीब मुलांच्या घराबाहेर गुपचूप भेटवस्तू किंवा सोन्याची नाणी ठेवून येत असत.
मोज्यात भेटवस्तू मिळण्याची कथा
एका कथेनुसार, एका गरीब व्यक्तीच्या तीन मुलींच्या लग्नासाठी निकोलस यांनी गुपचूप सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्या त्यांच्या चिमणीतून घरात टाकल्या. त्या पिशव्या चुलीजवळ सुकवण्यासाठी ठेवलेल्या 'मोज्यांमध्ये' (Stockings) जाऊन पडल्या. तेव्हापासून ख्रिसमसला मोज्यांमध्ये गिफ्ट मिळण्याची परंपरा सुरू झाली.
सेंट निकोलस यांच्या या 'सांता' होण्याचा प्रवास डच शब्द 'सिंटरक्लास' (Sinterklaas) वरून झाला, ज्याचे पुढे इंग्रजीमध्ये 'सांता क्लॉज' असे नामकरण झाले.
ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा कशी सुरू झाली?
ख्रिसमस ट्री म्हणून आपण ज्या झाडाचा वापर करतो त्याला 'फर' (Fir) किंवा 'पाईन' (Pine) असे म्हणतात. हे झाड सदाबहार असते, म्हणजेच कडाक्याच्या थंडीत आणि बर्फातही ते हिरवेगार राहते.
असे सांगितले जाते की ख्रिश्चन धर्म येण्यापूर्वीही, अनेक संस्कृतींमध्ये सदाबहार झाडांच्या फांद्या घराबाहेर लावल्या जात असत. या झाडांना 'नव्या जीवनाचे' आणि 'सकारात्मकतेचे' प्रतीक मानले जायचे. ख्रिसमस ट्री सजवण्याची खरी सुरुवात 16 व्या शतकात जर्मनीमध्ये झाली. असे मानले जाते की, प्रसिद्ध धर्मसुधारक मार्टिन ल्यूथर हे एकदा जंगलातून चालले होते. बर्फाळ झाडांच्या फांद्यांमधून चमकणारे तारे पाहून ते मंत्रमुग्ध झाले. त्या ताऱ्यांची आठवण म्हणून त्यांनी घरी एक झाड आणले आणि त्यावर मेणबत्त्या लावून ते सजवले.
1848 मध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया आणि त्यांचे पती प्रिन्स अल्बर्ट यांनी ख्रिसमस ट्री सजवले आणि त्याचे चित्र वर्तमानपत्रात आले. त्यानंतर ही परंपरा जगभर लोकप्रिय झाली.
आज आपण हे झाड चॉकलेट्स, चकाकणारे बॉल आणि लाईट्सनी सजवतो, पण पूर्वी यामागे विशेष अर्थ होता:
मेणबत्त्या/लाईट्स: हे जगाचा प्रकाश (प्रभू येशू) दर्शवतात.
झाडाच्या टोकावर असलेला तारा त्या ताऱ्याचे प्रतीक आहे, ज्याने तीन ज्ञानी पुरुषांना येशूच्या जन्माच्या ठिकाणापर्यंत पोहोचवले होते.
सांता क्लॉज म्हणजे केवळ एक काल्पनिक पात्र नाही, तर तो 'निस्वार्थ सेवा' आणि 'आनंद वाटण्याचे' प्रतीक आहे. तसेच ख्रिसमस ट्री हे कठीण काळातही 'हिरवेगार' म्हणजेच आशावादी राहण्याचा संदेश देते. यंदा नाताळ साजरा करताना या गोष्टींमागचा हा सुंदर इतिहास आपल्या मुलांशी नक्की शेअर करा.
