होय, आपण बोलत आहोत लोकप्रिय अभिनेत्री सोनाली वर्मा यांच्याबद्दल ज्यांनी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सुपरहिट मालिकेत गायत्री म्हणजेच अक्षरा (हिना खान) यांच्या सासूचा रोल साकारला होता. हा रोल इतका लोकप्रिय झाला की आजही प्रेक्षक त्यांना ‘गायत्री’ म्हणूनच ओळखतात.
पत्रकारितेतून अभिनयाकडे प्रवास
सोनाली वर्मा अभिनयात येण्यापूर्वी पत्रकार होत्या. त्यांनी तब्बल 10 वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केलं. बातमीदार म्हणून त्यांनी चांगली ओळख निर्माण केली होती आणि अनेक नामांकित न्यूज चॅनेल्ससोबत काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी न्यूज अँकर म्हणून जबरदस्त यश मिळवलं.
advertisement
अभिनयात येण्याचा त्यांचा प्रवास योगायोगाने झाला. एका प्रसंगी त्यांची भेट जीतेंद्र यांच्याशी झाली आणि त्यांनी सोनालीचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व पाहून तिला आपल्या मुलगी एकता कपूर हिच्याशी भेटवून दिलं. एकताने लगेचच आपल्या मालिकेत त्यांना भूमिका दिली, आणि तिथून सोनालींच्या अभिनय कारकिर्दीची नवी सुरुवात झाली.
त्यांचा पहिला शो होता ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ज्यामध्ये त्यांनी गायत्रीचं पात्र साकारलं आणि घराघरात आपली ओळख निर्माण केली.
लग्नानंतर इंडस्ट्रीला निरोप
साल 2013 मध्ये सोनालींनी या शोमधून ब्रेक घेतला आणि नंतर त्यांच्या पात्राचा शेवट मालिकेत दाखवला गेला. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये त्यांनी सचिन सचदेव यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर संपूर्ण ग्लॅमर वर्ल्डलाच अलविदा केलं. आज त्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे स्थायिक आहेत आणि शांत, समाधानी जीवन जगत आहेत.
आता यूट्यूबर म्हणून नवी ओळख
अभिनय सोडल्यानंतरही सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या आता यूट्यूबर म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधत राहतात. त्यांच्या व्हिडिओंमध्ये त्या आपल्या कौटुंबिक जीवनातील क्षण, अनुभव आणि पॉझिटिव्ह विचार शेअर करतात.
त्यांची फॅन फॉलोइंग आजही तगडी आहे आणि अनेक चाहते त्यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र, सध्या तरी सोनालींचा अभिनय क्षेत्रात परतण्याचा कोणताही विचार नाही. त्या आपल्या कुटुंबासोबत आनंदी आणि समाधानपूर्ण जीवन जगत आहेत.
