पंजाबमधील पतियाळामध्ये काही दिवसांपूर्वी 10 वर्षांच्या एका मुलीचा केक खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. अशाच प्रकारची आणखी एक घटना पतियाळात घडली आहे. चॉकलेट खाल्ल्यानं येथील दोन मुलींची प्रकृती गंभीर बनली. त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक ज्या दुकानातून चॉकलेट खरेदी केले होते तेथे पोहोचले. या पथकाने दुकानातील चॉकलेटचे नमुने घेतले. सध्या या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. या नमुन्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. हे दुकान तातडीने सील करावे अशी मागणी या मुलींच्या कुटुंबीयांनी केली आहे.
advertisement
आरोग्य विभागाचे अधिकारी विकास जिंदल यांनी सांगितले की, पोलिसांकडून माहिती मिळाल्यावर आम्ही संबंधित दुकानात गेलो. दुकानातील सर्व मालाची तपासणी सुरू आहे. या दुकानात बराच जुना माल पडलेला आहे. या दुकानातील 90 टक्के माल जुना झाला असल्याचे तक्रारदारानं म्हटलं आहे.
या मुलींच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे काही नातेवाईक लुधियानात राहतात. काही दिवसांपूर्वी हे नातेवाईक आम्हाला भेटायला पतियाळा येथे आले होते. येथील एका किराणा स्टोअरमधून त्यांनी चॉकलेट खरेदी केले. घरी आल्यावर त्यांनी मुलींना चॉकलेट खायला दिले. मुलींनी चॉकलेट खाताच त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. कुटुंबातील सदस्य त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, चॉकलेट खाल्ल्याने या मुलींची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी डॉक्टरांना चॉकलेटचे रॅपर दाखवले असता, ते चॉकलेट मुदतबाह्य झाल्याचे दिसले. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार आरोग्य विभागाचे पथक पतियाळातील चॉकलेट खरेदी केलेल्या दुकानात पोहोचले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात पंजाबच्या पतियाळामध्ये एका 10 वर्षाच्या मुलीचा तिच्या वाढदिवशीच मृत्यू झाला. वाढदिवसाच्या निमित्तानं जो केक तिनं कापला, तो खाल्ल्याने तिची प्रकृती बिघडली. तिचं शरीर थंड पडले. रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, असा दावा या मुलीच्या कुटुंबियांनी केला. कुटुंबियांनी सांगितलं की, वाढदिवसानिमित्त आम्ही ऑनलाइन केक मागवला होता. मृत्यूपूर्वी काही तास या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात केक कापताना ही मुलगी खूप खुश होती. याप्रकरणी आरोग्य विभागाने ज्या बेकरीतून केक आणला होता, त्या न्यू इंडिया बेकरीवर दंडात्मक कारवाई केली. तसेच बेकरीविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.