घराचा फ्लॅट नंबर असो, मजला असो की वाहनाचा नोंदणी क्रमांक. बहुतांश लोकांना हा नंबर नको असतो किंवा ते घ्यायला त्यांच्या मनात भीती बसली आहे. शास्त्रीय भाषेत “Triskaidekaphobia” असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहितीय का की 13 नंबरला अशुभ का समजलं जातं?
ख्रिश्चन धर्मातील श्रद्धा
ईसाई धर्मात 13 या संख्येचा “अशुभ” अर्थ अंतिम भोजनाच्या प्रसंगाशी जोडला जातो. असं मानलं जातं की येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांसोबत शेवटचं जेवण घेत होते. त्या टेबलावर बसलेला 13 वा व्यक्ती म्हणजे यहूदा इस्करियोती, ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला आणि येशूला क्रॉसावर चढवलं गेलं. त्या घटनेनंतर 13 या संख्येला दुर्दैवाचं प्रतीक मानलं जाऊ लागलं.
advertisement
नॉर्स पौराणिक कथा
उत्तर युरोपातील नॉर्स पुराणकथांनुसार, एकदा वल्हाला येथे 12 देवता एका मेजवानीसाठी जमल्या होत्या. अचानक, लोकी नावाचा धूर्त देवता 13 वा अनाहूत पाहुणा म्हणून आला. त्याच्या आगमनानंतर लगेचच प्रिय देव बाल्डरचा मृत्यू झाला. त्यानंतर 13 हा अंक अपशकुन आणि मृत्यूचं प्रतीक बनला.
प्राचीन सभ्यतांमधील दृष्टिकोन
अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये 12 हा अंक पूर्णतेचं प्रतीक मानला जायचा. जसं 12 महिने, 12 राशी, 12 तास दिवसाचे आणि 12 तास रात्रीचे.
या परिपूर्ण संख्येनंतर येणारा 13 अंक “अपूर्णता” आणि अस्थिरतेचं चिन्ह मानला जात असे. त्यामुळे त्याला अशुभ मानलं जातं.
शुक्रवार, 13 तारीख; जगभरात भीतीचा दिवस
“Friday the 13th” ही संकल्पना संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या दिवशी अपघात, अपशकुन किंवा अनिष्ट घटना घडतात असा समज आहे.
इतिहासात 13 ऑक्टोबर 1307, शुक्रवार या दिवशी फ्रान्सच्या राजा फिलिप चतुर्थाने “नाइट्स टेम्पलर” नावाच्या शक्तिशाली ख्रिश्चन संघटनेवर अत्याचार सुरू केले. त्या घटनेनंतरशुक्रवार, 13 तारीख हा दिवस इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
ज्योतिष आणि अंकशास्त्रातील अर्थ
अंकशास्त्रानुसार 12 हा अंक व्यवस्था, स्थैर्य आणि संतुलनाचं प्रतीक आहे. पण त्यानंतरचा 13 हा अंक बदल, विद्रोह आणि अनिश्चिततेचा संकेत मानला जातो. म्हणून आजही अनेकांना हा नंबर भयभीत करतो आणि ते याला “अशुभ” समजतात.
