रेड कार्पेटचा इतिहास
रेड कार्पेटचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. ऐतिहासिक नोंदीनुसार, इ.स.पू. 458 मध्ये लिहिलेल्या ग्रीक नाटक ‘अॅगॅमेम्नॉन’ मध्ये कार्पेटचा पहिला उल्लेख सापडतो. या नाटकात राजा अगॅमेम्नॉन ट्रोजन युद्धातून परत येतो, तेव्हा त्याच्या सन्मानार्थ लाल गालिचा अंथरला जातो. त्या काळी लाल रंग राजसत्तेचा, सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जात असे. ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्येही या रंगाला विशेष स्थान होतं.
advertisement
हळूहळू ही परंपरा जगभर पसरली. 1821 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांच्या स्वागतासाठी अधिकृतरीत्या प्रथमच रेड कार्पेट वापरला गेला. नंतर 1920 च्या दशकात हॉलिवूडमध्ये रेड कार्पेटचा वापर फॅशन आणि फिल्म इव्हेंट्ससाठी होऊ लागला. आजही जगभरातील पुरस्कार सोहळे, प्रीमियर इव्हेंट्स आणि राजकीय समारंभ रेड कार्पेटशिवाय अपूर्ण वाटतात.
लालच का निवडला गेला?
लाल रंगाला सुख, संपन्नता आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. प्राचीन काळात राजा-महाराजे त्यांचा खजिना किंवा मौल्यवान वस्तू लाल कपड्यात ठेवत असत. लाल पोटली म्हणजे आत काहीतरी मौल्यवान आहे, हे त्या काळचं सार्वत्रिक चिन्ह होतं. त्यामुळे जेव्हा एखाद्या मान्यवराचं स्वागत करायचं असतं, तेव्हा त्याच्यासाठी लाल रंगाचा गालिचा अंथरणं म्हणजे त्याला शाही सन्मान देणं असं मानलं जातं.
सोन्याच्या डब्यातही लाल रंग
तुम्ही लक्ष दिलं असेल, तर दागिन्यांच्या डब्यांमध्येही आतून लाल रंगाचं कापड असतं. अंगठी असो, चेन असो किंवा मंगळसूत्र त्या डब्यांचा आतला भाग लालच रंगाचा असतो. कारण हा रंग मौल्यवानतेशी जोडलेला आहे.
भारतात कधी वापरला गेला रेड कार्पेट?
भारतात प्रथमच 1911 साली दिल्ली दरबारात रेड कार्पेटचा वापर झाल्याचं म्हटलं जातं. तेव्हा तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगे यांनी किंग जॉर्ज पाचव्या यांच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरला होता. त्या दिवसापासून ते आजपर्यंत ही परंपरा सन्मान आणि प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून जगभर पाळली जाते. विमानातून उतरतानाही राष्ट्रप्रमुख, सेलिब्रिटी किंवा पाहुण्यांच्या पावलाखाली नेहमीच लाल गालिचाच असतो.
