RamNavami 2026: श्रीरामनवमीची अचूक तिथी, पूजा-विधी कशी करतात; रामायणामधून कोणता बोध मिळतो
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
RamNavami 2026: प्रभू रामचंद्र आदर्श पुरूष होते. त्यांचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठीच त्यांची श्री रामनवमी दिवशी पूजा करणे श्रेष्ठ असते. कर्तव्यतत्परता, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श मित्र, उदार व नि:स्वार्थी मन, सदाचारी वृत्ती, पितृभक्ती इत्यादी अनेक गुण प्रभू रामचंद्रांपाशी होते.
मुंबई : गुढी पाडव्यानंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे श्री रामनवमी. मराठी पंचागानुसार मध्यान्हकाली चैत्र शुक्ल नवमी असेल त्यादिवशी श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी गुरुवारी 26 मार्च रोजी मध्यान्हकाली चैत्र शुक्ल नवमी आहे म्हणून त्याचदिवशी श्रीराम नवमी साजरी करायची आहे, असे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. रामनवमीच्या सणाविषयी त्यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊ.
26 मार्च रोजी सकाळी 11.49 वाजता चैत्र शुक्ल नवमी सुरू होत असून त्याच दिवशी मध्यान्हकालात चैत्र शुक्ल नवमी आहे. म्हणून गुरुवारी 26 मार्च रोजीच श्रीराम नवमी साजरी करावयाची आहे. अष्टमीकालात कीर्तनाला प्रारंभ करायला हरकत नाही असेही त्यांनी सांगितले.
प्रभू रामचंद्र आदर्श पुरूष होते. त्यांचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठीच त्यांची श्री रामनवमी दिवशी पूजा करणे श्रेष्ठ असते. कर्तव्यतत्परता, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श मित्र, उदार व नि:स्वार्थी मन , सदाचारी वृत्ती, पितृभक्ती इत्यादी अनेक गुण प्रभू रामचंद्रांपाशी होते. रामराज्य एक आदर्श राज्य होते. प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ ऋषींनी वेदविद्या शिकविली तर विश्वामित्र ऋषीनी प्रभू रामचंद्रांना धनुर्विद्या शिकविली. वाल्मिकी ऋषीनी लवकुशाचा सांभाळ केला होता.
advertisement
रामायण कसे जीवन जगावे हे शिकवते तर महाभारत कसे जीवन जगू नये त्याचे दर्शन घडविते असे सांगितले जाते. वाल्मिकी रामायण हा ग्रंथ अद्वितीय असा आहे. नारदमुनीनी वाल्मिकी ऋषींना रामकथा ऐकविली आणि ब्रह्मदेवानी वाल्मिकी ऋषींना रामचरित्र लिहिण्याची आज्ञा केली असे सांगितले जाते. या ग्रंथामध्ये एकूण सात कांडे असून 24 हजार श्लोक आहेत. काही जण बुद्ध साहित्यात बुद्धाला रामाचा अवतार मानतात. जैन पंथियांनी रामाला आठवा बलदेव असल्याचे म्हटले आहे. संस्कृत वाड्.मयात भासाने अभिषेक, बालचरित, प्रतिमा नाटकात रामकथेचा प्रवाह आणून सोडला आहे. भवभूतीने महावीरचरित व उत्तर रामचरित या दोन नाटकात रामचरित्र वर्णन केलेले आहे. दक्षिण भारतात 12 अळवार संतांनी रामकथेवर खूप अभंग लिहिले आहेत. संत एकनाथानी तर भावार्थ रामायण लिहिले. समर्थ रामदासांनी युद्धकांड, सुंदरकांड, अरण्यकांड अशा रामकथा लिहिल्या आहेत. थोर नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले रामराज्यवियोग हे नाटक लोकप्रिय झाले होते. रामायणावर अनेक चित्रपट, लोकनाट्ये लिहिली गेली आहेत. सुप्रसिद्ध कवी ग. दि. माडगुळकर यांचे गीतरामायण तर आजही लोकप्रिय आहे.
advertisement
श्रीरामरक्षा स्तोत्र - भारतातच नव्हे तर परदेशात गेलेल्या लोकांच्या घरात दररोज रामरक्षा स्तोत्र म्हणण्याची प्रथा आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र खूप लोकप्रिय आहे. अनेकांना हे स्तोत्र पाठ असते. शिवशंकरांनी सांगितले म्हणून बुध कौशिक ऋषींनी हे स्तोत्र लिहिले. श्रीरामरक्षा स्तोत्रात एकूण 40 श्लोक आहेत. 2 श्लोक ध्यानाचे आहेत तर इतर 38 श्लोक आहेत. हनुमान हा कीलक म्हणजे रक्षक आहे आणि सीता ही स्तोत्राची शक्ती आहे. रामनामाचा जप हा विनियोग आहे. चौथ्या श्लोकापासून नवव्या श्लोकापर्यंत रामकवच आहे. याला रक्षाकवच किंवा वज्रपंजर कवच असेही म्हणतात. हा रामरक्षा स्तोत्राचा गाभा आहे. रामाने आपले सर्वांचे रक्षण करण्याबद्दल प्रार्थना या स्तोत्रात केलेली आहे.
advertisement
रामायणापासून बोध -
रामायणातील प्रत्येक व्यक्तीकडून आपणांस शिकता येईल. प्रभूरामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते. मर्यादा म्हणजे आचारसंहिता! मर्यादेचे उल्लंघन न करणारा! पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च व्यक्ती! माणूस जास्तीत जास्त किती चांगला वागू शकतो त्याची सीमा दाखविणारा तो मर्यादा पुरुषोत्तम! सनातन वैदिक धर्मांची शिकवण सांगते की, ‘माणसाने माणसांशी माणसांसारखे वागावे!’ राम हा आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श राजा होता. त्यांचे स्वभाव, गुण आणि कर्म सारेच आदर्श होते. यशस्वी माणसे ही अडचणीतही प्रगतीसाठी संधी शोधतात आणि अयशस्वी माणसे संधी आली असता अडचणी सांगत बसतात. वाल्मिकी रामायण हे केवळ ऐतिहासिक काव्य नसून मानवाचा जीवनमार्ग प्रकाशन टाकणारा एक महान दीपस्तंभ आहे. रामायणामध्ये सागराची गंभीरता, गंगेची पवित्रता आणि हिमालयाची उत्तुंगता आहे. वेदांमधील तत्त्वज्ञान सामान्य माणसाला समजत नाही. ते रामायण- महाभारताला समजते. रामायण हे भूलोकीचे अमृत आहे. नीतीमत्ता ही राज्यकारभारात सर्वश्रेष्ठ आहे. आजही या नीतीमत्तेची खरी गरज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 12:52 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
RamNavami 2026: श्रीरामनवमीची अचूक तिथी, पूजा-विधी कशी करतात; रामायणामधून कोणता बोध मिळतो








