pandharpur wari 2024 विशेष ब्लॉग : "नाथांच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान" भारुडाचे गारुड (भाग 3)
- Published by:sachin Salve
Last Updated:
नाथ महाराजांचे हे कूट म्हणजे खरोखरच मोठे अवघड कोडे आहे. आध्यात्मिक दृष्टीने हे कोडे सोडवायचे असेल तर त्याचा उलगडा केवळ महाराजच करु जाणे.
लेखक- डॉ नरेंद्र भिकाजी कदम
मंडळी, आपण नाथांचे इंगळीचे, विंचवाचे भारुड पाहिले. माझी खात्री आहे जेव्हा तुम्ही विंचू हा शब्द वाचला असेल तेव्हाच शाहीर साबळेंनी सादर केलेले ‘विंचू चावला’ हे भारुड तुमच्या डोळ्यासमोर दिसू लागले असेल. त्यांच्या सादरीकरणात ‘मनुष्य इंगळी अति दारुण’ या शब्दावर केलेली कोटी ऐकून हास्य रसात बुडाला नाही असा मराठी माणूस या जगात कुठेच सापडणार नाही. नेमके काय आहे या ‘भारुडांचे गारुड ? ‘कुछ तो खास बात है इसमे |’ ज्यामुळे इतकी वर्ष झाली तरी आजही कुठे भारुडाचा कार्यक्रम असला तर लोक आवर्जून उपस्थिती लावतात.
advertisement
भारुडाचा एक वेगळा बाज आहे. पूर्वी नारदीय कीर्तन परंपरेत लळीत हा प्रकार सादर केला जात होता. ही लळीते म्हणजे एकप्रकारचा नाट्याविष्कारच होती. या लळीताच्या जवळ जाणारा प्रकार म्हणजे भारुड हा आहे. भजनी मंडळामध्ये काहीजण अभंग म्हणणारे असतात. काही जणांचा आवाज गौळणी म्हणताना लय खुलतो, तसेच काहीजण भारूड म्हणण्यात पटाईत असतात.
advertisement
भारुड सांगणारा हा बुवा सुरुवातीला भारुडाची प्रस्तावना करुन भारुडाला सुरवात करतो. साथीला असलेल्या मंडळींना जोडीला घेऊन तोच निरनिराळी रुपे (सोंगे) घेऊन, गायन करत संवादात्मक रीतीने (लोकनाट्यात ज्याप्रमाणे बतावणी असते, काहीशी तशीच बतावणी भारुडातही असते) भारुड पुढे घेऊन जात असतो. बुवांच्या जोडीने असणारी इतर भजनी मंडळीही निरनिराळ्या भूमिका (सोंगे) वठवत असतात. खांद्यावरचा पंचा डोक्यावरून घेतला अन कपाळी कुंकवाचा ठसठशीत टिळा लावला की, जागच्या जागी बाप्याची “बुरगुंडा होवो तुला बुरगुंडा” असे म्हणणारी बाई होते. शेजाऱ्याचे घोंगडे खांद्यावर घेतले की त्याचा, “जोहार मायबाप, जोहार” करणारा महार होतो. बाईची भूमिका साकारण्याऱ्याच्या ओठांवर कधी जाडजूड मिशा ही दिसतात. मिशीवाली बाई अन तिचे ते नको त्या जागेवर चिमटे काढणारे खटकेदार नाट्यात्मक संवाद प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवतात.
advertisement
रंगभूमीवर नाटक रंगवत असताना अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीची गरज असते. भारुडाच्या या नाट्याला ना रंगभूमीची गरज लागते ना कोणत्या प्रॉपर्टीची. कोणाच्याही अंगणात, परसात, देवळात, वडाखाली इतकेच काय हरिनाम सप्ताहाची जागा म्हणजेच भारुडाचा रंगमंच असतो. आणि बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावरची वस्त्रे म्हणजे यांची प्रॉपर्टी. आजूबाजूला बसलेल्या लोकांचे पंचे, फेटे, टाळ, मृदंग या गोष्टींचा उपयोग करुन हे नाट्य पुढे जात असते. हीच या नाट्यासाठी लागणारी प्रॉपर्टी असते. ठेक्यासाठी वापरला जाणारा मृदंग वाघ्याची टिमकी होते, कधी संबळ होतो तर कधी पोतराजाचा ढोल होतो. धोतराचा सोगा सोडून लुगड्याच्या पदरासारखे डोक्यावरून घेतले की त्याचेच लुगडे होते. आजूबाजूच्या चार लोकांचे पंचे गोळा केले की तयार होणारे गाठोडे म्हणजे वैदूची पोतडी तयार होते.
advertisement
हे सर्व नाट्य घडत असताना अधूनमधून विठ्ठल, विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकारामचा चाललेला जयघोष प्रेक्षकांना या नाट्यात सामील करुन घेत असतो. नाट्यात्मक संवाद संपवून बुवा जेव्हा ‘विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल’ करत समेवर येतो तेव्हा समोर बसलेला प्रेक्षक त्याच्या तालावर आपले टाळ वाजवत जयघोषात सामील होतो.
प्रपंच करत असताना परमार्थ कसा साधायचा याची शिकवण देणे हा या नाट्याचा मूळ उद्देश असतो. आजूबाजूच्या सध्य परिस्थितीला साजेशा रुपकांची सुंदर पेरणी या नाट्यात असते. या अशा निरनिराळ्या रुपकांतून समाजाला प्रबोधन करणारे संदेश दिले जातात. प्रसंगी भारुडातल्या या रुपकांचा अर्थ लावण्याची प्रगल्भता या प्रेक्षकांत नसली तरी समोर चाललेले नाट्य त्यांना भावलेले असते. त्यामुळे या नाट्याचा आस्वाद ही मंडळी मनापासून घेत असतात. भारुडाचा प्रेक्षक हा परमार्थाचा चाहता असतो. प्रपंच करत असताना परमार्थ साधणे त्याचे ध्येय असते.
advertisement
लहानपणापासून कोडी सोडवण्याचा छंद प्रत्येकालाच असतो. कोडे सोडवत असताना घटकाभर मेंदुला चालना मिळत असते. कोडे सोडवताना मेंदुला आलेली मरगळ निघून जाते. मन ताजेतवाने होते. आपले आयुष्य हे ही विधात्याने रचलेले कोडेच आहे. नाथांनी भारुडे करताना अनेक रुपके वापरली. त्यांनी कूट (कोडे) हा प्रकारही हाताळला आहे. जगराहाटीच्या विपरीत अशी विधाने करुन त्यातून काही वेगळा अर्थ प्रतीत होतो त्याला कूट म्हणतात. नाथांचे खाली दिलेले भारुड कूट या प्रकारातील आहे.
advertisement
नाथांच्या घरची उलटी खूण | पाण्याला मोठी लागली तहान ||१||
आंत घागर बाहेरी पाणी | पाण्याला पाणी आले मिळोनी ||२||
आजी मी एक नवल देखिले | वळचणीचे पाणी आढ्याला लागले ||३||
शेतकऱ्याने शेत पेरिले | राखणदाराला तेणे गिळिले ||४||
हांडी खादली भात टाकिला | बकऱ्यापुढे देव कापिला ||५||
एका जनार्दनी मार्ग उलटा | जो जाणे तो गुरूचा बेटा ||६||
नाथ महाराजांचे हे कूट म्हणजे खरोखरच मोठे अवघड कोडे आहे. आध्यात्मिक दृष्टीने हे कोडे सोडवायचे असेल तर त्याचा उलगडा केवळ महाराजच करु जाणे. या भारुडातील रूपकांकडे व्यावहारिक दृष्ट्या पाहिले तर, यात पराकोटीच्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडताना दिसतात. या गोष्टींचा अर्थ तेव्हाच लक्षात येईल जेव्हा या गोष्टीतला अध्यात्मिक अर्थ लक्षात येईल. नाथांनी हे कोडे घालून वाचकांना कोड्यात पाडले आहे खालील विवेचनावरून लक्षात येते.
नाथांच्या घरची उलटी खूण | पाण्याला मोठी लागली तहान ||१||
विश्वात परमात्मा सर्वत्र चैतन्य रूपाने भरला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या आधारावरच हा विश्वाचा डोलारा प्रकृतीने सांभाळाला आहे. परंतु हा जीव मायामोहाने देह हेच सर्वस्व मानून भुलला असल्यामुळे हे सर्व विश्व ज्याच्या आधारावर चालते त्या परमात्म्यास विसरला. जीवचैतन्य आणि विश्वचैतन्य यात फरक नाही, परंतु देहतादात्म्यामुळे जीव संकुचित भावनेने राहत होता. या देहतादात्म्याचा त्याग करून ईश्वरी चैतन्याचा भोग घ्यावा अशी तहान त्याला लागली आहे. म्हणून नाथ म्हणतात पाण्याला मोठी लागली तहान.
आंत घागर बाहेरी पाणी | पाण्याला पाणी आले मिळोनी ||२||
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.
अथावीं घट बुडाला। तो आंतबाहेरी उदकें भरला ।
पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे?॥६५॥
मातीचा घडा कुणी पाण्यात बुडवून भरून घेतला अन माठाला कशाचा प्रहार होऊन तो फुटला. तर माठातले पाणी आणि बाहेरचे पाणी याचा फरक कळेल का ? माठ होता, तोवर माठातील पाणी आणि बाहेरचे पाणी हा फरक तरी जाणवत होता. पण आता माठाचे अस्तित्वच नाहीसे झाले तेंव्हा पाण्याचे भासमान वेगळेपण नष्ट झाले. पाण्यांत पाणी मिळाले. माठ फुटला म्हणून पाण्याला काहीच झाले नाही ते कसे फुटणार ?
त्याचप्रमाणे जीवचैतन्याची अविद्येने उत्पन्न झालेली देहतादात्मतारूप नष्ट झाल्याबरोबर जीवचैतन्य, समष्टी चैतन्यात मिसळून जाते. देहरूप उपाधीत प्रतिबिंबित झालेले सर्वगत चैतन्य उपाधी नष्ट झाल्याबरोबर एकरूप होते.
आजी मी एक नवल देखिले | वळचणीचे पाणी आढ्याला लागले ||३||
अजून नवलाची गोष्ट तर यापुढेच घडली आहे. वळचणीचे पाणी चक्क आढ्यास लागले आहे. वळचणीचे पाणी उलटे वर आढ्याला लागणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही. पण ज्याप्रमाणे घटाची उपाधी (घट) नष्ट झाल्याबरोबर घागरीतले पाणी आणि बाहेरचे पाणी एकरूप होते तद्वतच जीव आणि चैतन्य एकरूप होते. म्हणून महाराज म्हणतात, वळचणीचे पाणी आढ्या लागले.
शेतकऱ्याने शेत पेरिले | राखणदाराला तेणे गिळिले ||४||
शेतानेच राखणदाराला गिळून टाकले हे ही एक नवलच घडले. परंतु गंमत अशी आहे की सर्व जीवात जो ईश्वर देहरूपी शेताची राखण करत आहे. तो जीव अज्ञानाने विषय लोलुपतेमुळे ईश्वराचे अस्तित्व विसरला. म्हणून नाथ महाराज म्हणतात देहरूपी शेताने ईश्वर रुपी राखणदारास घेऊन टाकले.
हांडी खादली भात टाकिला | बकऱ्यापुढे देव कापिला ||५||
हंडीत भात शिजवल्यानंतर भात खाऊन हंडी टाकून दिली (कोणी भात टाकून हंडी खात नाही) जाते. परंतु हा जीव मायामोहने इतका भ्रमित झाला आहे की देहरुपी हंडी मध्ये असणारा परमात्मारुपी भाताला टाकून हंडीचाच म्हणजेच विषयांचा उपयोग घेऊ लागला आहे. हे उदाहरण म्हणजे असेच झाले ना, देहतादात्म्य करणाऱ्या मनापुढे देवाचा बळी दिला, म्हणजे विषय लोलुपतेने मनाला आपल्या संकलपांचा विसर पडला.
एका जनार्दनी मार्ग उलटा | जो जाणे तो गुरूचा बेटा ||६||
शेवटी नाथ महाराज सांगतात की आतापर्यंत वर्णन केलेला हा सर्व मार्ग उलटा आहे. असे असले तरी जीव हा या उलट्या मार्गाने चालला आहे. या उलट्या मार्गाने न चालता गुरु च्या कृपेने प्राप्त झालेल्या सरळ मार्गाने जाण्याची ज्याला जाणीव होते त्यालाच खरी गुरुची कृपा झाली असे म्हणावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 03, 2024 7:52 PM IST
मराठी बातम्या/Blog/
pandharpur wari 2024 विशेष ब्लॉग : "नाथांच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान" भारुडाचे गारुड (भाग 3)