महानगरपालिकेत नोकरीचं आमिष अन् 43 जणांसोबत 33 लाखांचा 'गेम'; मुंबईत काय घडलं?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तब्बल 43 जणांची महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 33 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : मुंबई, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 43 जणांची महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 33 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत सांगलीतील 50 वर्षीय शेतकऱ्यासह अनेकांकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे.
सांगलीतील अनिलकुमार गाँजारी (50) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून 2024 मध्ये त्यांची ओळख माया चव्हाण (59) हिच्याशी नातेवाईकांमार्फत झाली. संबंधित महिला पालिकेच्या एल वॉर्ड, कुर्ला येथे कार्यरत असल्याचे सांगत होती. तिने पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचा दावा करून शिपाई, लिपिक, आर. ए. लिपिक आणि हेड क्लार्क अशा विविध पदांसाठी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येकी 1.70 लाख ते 2.50 लाख रुपये आकारले जातील, असे सांगण्यात आले.
advertisement
सुरुवातीला फॉर्म फीच्या नावाखाली पैसे घेण्यात आले. त्यानंतर उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतली. पुढे घाटकोपर पूर्व येथील पारेख हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराकडून 10 हजार रुपये रोख रक्कम घेण्यात आल्याचा आरोप आहे.
advertisement
ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे 24 लाख 68 हजार रुपये पाठवण्यात आले. तसेच मुंबईत प्रत्यक्ष भेटीत 8 लाख 30 हजार रुपये रोख देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, संबंधित महिला प्रत्यक्षात महानगरपालिकेत केवळ शिपाई पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. इतर आरोपींनी बनावट ओळखपत्रे आणि शिक्के वापरून स्वतःला अधिकारी म्हणून भासविल्याचा संशय आहे. या प्रकरणात प्रथमेश चव्हाण, सुरेंद्र गुरव आणि राहुल जाधव यांच्यासह इतरांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
स्टॅम्प पेपरवर पैसे परत करण्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही मुदतीनंतर रक्कम न परतवल्याने अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिला सेवानिवृत्त झाल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली असून पोलिस सखोल तपास करत आहेत. या प्रकरणातील फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 7:53 AM IST










