ते उसाचं पाचट जाळायला गेलेले पण वाऱ्यानं घात केला; क्षणात सगळं राख झालं, पुण्यात शेतकऱ्याचा धक्कादायक शेवट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आगीने घेतलेल्या रौद्र रूपामुळं आणि वाऱ्याच्या वेगामुळं स्वतःच्याच शेतात आगीच्या वेढ्यात अडकून जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९, रा. पारगाव) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला
दौंड : शेतात राबणाऱ्या बळीराजावर निसर्गाने पुन्हा एकदा क्रूर घाला घातला आहे. उसाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट पेटवून देणं एका ६९ वर्षीय शेतकऱ्याच्या जीवावर बेतलं. आगीने घेतलेल्या रौद्र रूपामुळं आणि वाऱ्याच्या वेगामुळं स्वतःच्याच शेतात आगीच्या वेढ्यात अडकून जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९, रा. पारगाव) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळं संपूर्ण दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास जालिंदर भाडळे हे त्यांच्या शेतात काम करत होते. उसाची तोडणी पूर्ण झाल्याने शेत साफ करण्यासाठी त्यांनी पाचट जाळण्याचा निर्णय घेतला आणि आग लावली. मात्र, दुपारची वेळ असल्याने वाऱ्याचा वेग अचानक वाढला आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केलं.
advertisement
आगीच्या ज्वाळांनी चारही बाजूंनी वेढलं
कोरडं पाचट असल्यानं आगीचा भडका उडाला. धुराचे लोट आणि धग इतकी प्रचंड होती की, भाडळे यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. आगीच्या ज्वाळांनी त्यांना चारही बाजूंनी घेरलं. धुरामुळं गुदमरून आणि गंभीररीत्या भाजल्यानं त्यांचा जागीच करुण अंत झाला. बराच वेळ झाला तरी भाडळे घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली, तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
advertisement
गंभीररीत्या भाजलेल्या भाडळे यांना तातडीने केडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. जालिंदर भाडळे यांच्या निधनाने पारगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 7:16 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
ते उसाचं पाचट जाळायला गेलेले पण वाऱ्यानं घात केला; क्षणात सगळं राख झालं, पुण्यात शेतकऱ्याचा धक्कादायक शेवट










