Marathi Movie : मराठी चित्रपट प्रेमींसाठी Good News! जुन्या फिल्म नव्याने पाहा, त्याही Freeमध्ये, पण कुठे?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Movies : जुन्या मराठी चित्रपटांची जादू नव्याने अनुभवण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
Marathi Movies : सिनेरसिकांना जुने मराठी चित्रपट नव्याने पाहता यावेत आणि नव्या पिढीपर्यंत आपल्या मराठी चित्रपटांचा वारसा पोहोचावा या उद्देशाने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 'चित्रपट रसास्वाद'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभात फिल्म कंपनी निर्मित ‘संत तुकाराम’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमाला सिने रसिकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला.
सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही चित्रपट संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी 'चित्रपट रसास्वाद' महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 'चित्रपट रसास्वाद' मंडळाची स्थापना करण्यामागे प्रमुख उद्देश हा दर्जेदार चित्रपट बघणारा रसिकवर्ग घडविणे आहे. जुन्या काळातील गाजलेले आणि ऐतिहासिक महत्त्वाचे चित्रपट तसेच नव्या पिढीने निर्मित केलेले सकस, प्रगल्भ व विचारप्रवर्तक चित्रपट यांचा रसिकांना आस्वाद घेता यावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
advertisement
‘संत तुकाराम’चं खास प्रदर्शन
'संत तुकाराम' हा प्रभात कंपनीने 1936 साली निर्मित केलेला एक ऐतिहासिक चित्रपट आहे. दिग्दर्शक विष्णुपंत दामले आणि शेख फतेलाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने केवळ मराठीच नव्हे तर जागतिक पातळीवरही लौकिक मिळवला. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे रसिकांना मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाची झलक अनुभवता आली.
advertisement
आशिष शेलार काय म्हणाले?
उत्तम निर्मिती मूल्य आणि दिग्दर्शन असलेले अनेक चित्रपट आपण आई-वडिलांसोबत पाहिलेले आहेत. या चित्रपटांनी संस्कार आणि राष्ट्र निर्मितीची भावना जागृत केली आहे. मराठी माणसांसाठी असे ऐतिहासिक मूल्य असलेले चित्रपट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. प्रगतीत गती असते, परंतु प्रगतीच्या वेगात सांस्कृतिक, संवेदनशील आणि सकारात्मक समाजाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष होता कामा नये, हे लक्षात घेऊनच कला, साहित्य, संस्कृती नाटक, चित्रपट आदि क्षेत्रात शासन भरीव काम करत असल्याचे, सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री आशिष शेलार यावेळी म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Movie : मराठी चित्रपट प्रेमींसाठी Good News! जुन्या फिल्म नव्याने पाहा, त्याही Freeमध्ये, पण कुठे?