सैफ अली खानला 15000 कोटींचा फटका? 25 वर्षांपूर्वीचा 'तो' निर्णय रद्द, आता नव्याने सुरू होणार लढाई!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bhopal Nawab Property Dispute : सैफ अली खानला भोपाळ नवाबच्या मालमत्ता वादात कोर्टातून धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने जुन्या निर्णय रद्द करून नव्याने सुनावणीचे आदेश दिले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला त्याच्या भोपाळ नवाबच्या कोट्यवधींच्या वडिलोपार्जित मालमत्ता वादात कोर्टातून एक अनपेक्षित धक्का बसला आहे. भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांच्या वारसांनी दाखल केलेल्या एका अपीलावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा तब्बल २५ वर्षांपूर्वीचा निर्णय रद्द ठरवत, या मालमत्ता वादावर पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही, तर ट्रायल कोर्टला ही सुनावणी एका वर्षाच्या आत पूर्ण करून नवा निकाल देण्यासही सांगण्यात आलं आहे.
काय आहे हा नवाबी मालमत्ता वाद?
हा कायदेशीर पेच नवाब हमीदुल्ला खान यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीसंदर्भात आहे. या प्रकरणात सैफ अली खानची पणजी साजिदा सुलतान यांचेही नाव जोडलेलं आहे. साजिदा सुलतान या नवाब हमीदुल्ला खान यांच्या मोठ्या बेगमच्या कन्या होत्या, आणि सुरुवातीला ही मालमत्ता त्यांना मिळाली होती. मात्र, नवाबच्या इतर वारसांनी मुस्लिम पर्सनल लॉनुसार मालमत्तेच्या न्यायसंगत वाटणीची मागणी करत, कनिष्ठ न्यायालयाच्या जुन्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.
advertisement
या वादाची सुरुवात भोपाळच्या ट्रायल कोर्टात झाली, जिथे २५ वर्षांपूर्वी यावर एक निर्णय दिला गेला होता. परंतु, नवाबच्या इतर वारसांनी हा निर्णय अमान्य करत उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. उच्च न्यायालयाने या अपीलाची दखल घेतली आणि ट्रायल कोर्टचा जुना निकाल रद्द करून, संपूर्ण प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
advertisement
सैफ अली खानच्या अडचणी वाढल्या
उच्च न्यायालयाचा हा ताजा निर्णय सैफ अली खानसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण यामुळे त्यांची पणजी साजिदा सुलतान यांना मिळालेल्या मालमत्तेच्या हक्कावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वादग्रस्त मालमत्तेत मुस्लिम पर्सनल लॉनुसार योग्य वाटणी झाली नाही, असा इतर वारसांचा दावा आहे आणि त्यांनाही त्यांचा कायदेशीर हिस्सा मिळावा अशी त्यांची मागणी आहे.
advertisement
नवाब हमीदुल्ला खान यांचा हा मालमत्ता वाद अनेक दशकांपासून सुरू आहे आणि त्यावर अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये ही मालमत्ता तब्बल १५ हजार कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. आता उच्च न्यायालयाने या प्रकरणाला नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. कोर्टाने ट्रायल कोर्टला ही सुनावणी १ वर्षाच्या आत पूर्ण करावी असंही बजावलं आहे, जेणेकरून वारसांना लवकर न्याय मिळू शकेल.
advertisement
हा केवळ बॉलिवूडशी संबंधित एक मुद्दा नाही, तर एका ऐतिहासिक नवाबी कुटुंबातील मालमत्ता हक्कांच्या लढाईचं हे एक प्रमुख उदाहरण बनलं आहे. आता यावर लवकरच एक नवा आणि अंतिम निर्णय येण्याची अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 04, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सैफ अली खानला 15000 कोटींचा फटका? 25 वर्षांपूर्वीचा 'तो' निर्णय रद्द, आता नव्याने सुरू होणार लढाई!







