सप्तरंगी सिनेमांचा 'थर्ड आय'! मुंबई-ठाण्यात आशियाई चित्रपटांची मेजवानी; पाहा काय आहे यंदाचं आकर्षण!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Third Eye Asian film festival: केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियाई चित्रपटसृष्टीत नावाजलेला 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा'त मुंबई आणि ठाण्याच्या पडद्यावर जागतिक दर्जाच्या सिनेमांचा सोहळा पाहायला मिळणार आहे.
मुंबई: केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियाई चित्रपटसृष्टीत नावाजलेला 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव' आपल्या २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. येत्या ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या काळात मुंबई आणि ठाण्याच्या पडद्यावर जागतिक दर्जाच्या सिनेमांचा सोहळा पाहायला मिळणार आहे.
इंडोनेशियन पद्धतीने होणार उद्घाटन!
या महोत्सवाचा श्रीगणेशा एका खास कलाकृतीने होणार आहे. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांची मनं जिंकणारा 'ऑन यूअर लॅप' (पांगकू) हा इंडोनेशियन चित्रपट यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन करेल. तब्बल ७ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात एकूण ५६ निवडक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
यंदाचं वर्ष चित्रपटसृष्टीसाठी खूप भावनिक आणि महत्त्वाचं आहे. भारतीय सिनेमाचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे 'दो आँखे बारा हाथ', 'कुंकू' आणि 'नवरंग' यांसारखे अजरामर चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांनी ही माहिती देताना आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
महोत्सवाचे संचालक डॉ. संतोष पाठारे यांनी यावेळच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे. यात केवळ विदेशी चित्रपटच नाहीत, तर आपल्या मातीतील गोष्टींनाही मानाचं स्थान देण्यात आलं आहे.
विविध भाषांमधील चित्रपट मांडणार भारताची विविधता
मराठी स्पर्धा विभागात 'उत्तर', 'एप्रिल मे ९९', 'गमन', 'निर्जळी' अशा ११ कसदार मराठी चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळेल. दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांच्या 'उत्तर' या चित्रपटाचीही यामध्ये विशेष चर्चा आहे. तर, आसामीपासून मल्याळमपर्यंत १२ विविध भाषांमधील चित्रपट भारताची विविधता मांडतील.
advertisement
यंदा किर्गिस्तान या देशाच्या सिनेमावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. चीन, जपान, इराण आणि तुर्की यांसारख्या देशांतील चित्रपट संस्कृतीचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येईल.
केवळ चित्रपट दाखवणं इतकाच या महोत्सवाचा उद्देश नाही, तर ज्यांनी सिनेमासाठी आपलं आयुष्य वेचलं त्यांचा गौरवही इथे होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार' प्रदान केला जाईल. उमा दा कुन्हा यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' देऊन गौरवण्यात येईल.
advertisement
कुठे आणि कधी?
९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ रोजी सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडलेले हे ५६ चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत.
advertisement
नुसते चित्रपट पाहून घरी जायचं नाहीये, तर इथे दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसोबत 'मास्टर क्लास' आणि 'ओपन फोरम' मध्ये थेट संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. त्यामुळे डायरीमध्ये या तारखा आत्ताच नोंदवून ठेवा!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 9:18 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सप्तरंगी सिनेमांचा 'थर्ड आय'! मुंबई-ठाण्यात आशियाई चित्रपटांची मेजवानी; पाहा काय आहे यंदाचं आकर्षण!










