'काल भरदिवसा हायवेवर...', प्रसिद्ध TV अभिनेत्री जन्नत झुबैरवर दिवसाढवळ्या हल्ला, स्वतः सांगितला भयानक प्रसंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jannat Zubair attacked: जन्नत झुबैरच्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जन्नतच्या टीमने हल्ल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
मुंबई: हिंदी मालिका विश्वातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री जन्नत झुबैर सध्या तिच्या कामामुळे नाही, तर एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जन्नत आणि तिचा भाऊ अयान यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. ही बातमी समोर येताच जन्नतच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, अभिनेत्रीचे कुटुंबिय किंवा पोलिस यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तथापि, नुकतंच जन्नतच्या टीमने या घटनेबाबत वक्तव्य केलं आहे.
जन्नत सध्या कलर्स चॅनलवरील रियालिटी शो लाफ्टर शेफ 3 मध्ये दिसत आहे. १५ मार्च रोजी ती भाऊ अयानसह पनवेलला जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये जन्नत आणि अयान यांना दुखापत झाल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र सोशल मीडियावरील या वृत्ताबपाबत कोणतीही पुष्टी झाली नव्हती. अशातच जन्नत झुबैरच्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जन्नतच्या टीमने या बातमीला दुजोरा दिला आहे.
advertisement
जन्नत झुबैरने सोशल मीडिया पोस्टमधून दिली हल्ल्याची बातमी
जन्नतच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे, "सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की, काल भरदिवसा हायवेवर जन्नत आणि अयानसोबत एक खूपच धक्कादायक प्रकार घडला. काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर शारीरिक हल्ला देखील झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता जन्नत आणि अयान दोघेही सुरक्षित आहेत. तुम्ही सर्वांनी जी काळजी दाखवली आणि आम्हाला जो पाठिंबा दिला, त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. — टीम जन्नत झुबैर"
advertisement
advertisement
जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोस्टमधून मिळालेल्या माहितीनुसार जन्नत आणि अयान सध्या सुरक्षित असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, जन्नत सुरक्षित असल्याची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. चाहत्यांनी जन्नतच्या पोस्टवर काळजी व्यक्त करत त्यांनी खबरदारी घेण्याचंही आवाहन केलं आहे. लोकप्रिय कलाकारच सुरक्षित नाही, तर सामान्यांचं काय होणार, अशी विचारणा करत लोकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे.
advertisement
जन्नत आणि अयानवर हा हल्ला कोणा आणि का केला, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता पोलिस तपासात काय माहिती समोर येतेय, हे येणारा काळच सांगेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 8:44 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'काल भरदिवसा हायवेवर...', प्रसिद्ध TV अभिनेत्री जन्नत झुबैरवर दिवसाढवळ्या हल्ला, स्वतः सांगितला भयानक प्रसंग










