Explainer: खोकला येतो म्हणून डॉक्टरांना न विचारता देताय कफ सिरप? 6 मुलांचा मृत्यू, खळबळजनक खुलासा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
छिंदवाडा जिल्ह्यात 'कोल्ड्रिफ' आणि 'नेक्सट्रॉस डीएस कफ सिरप'मुळे ६ मुलांचा मृत्यू, किडनी फेल; जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह यांनी तातडीने बंदी घातली. WHO, ICMR तपासणी सुरू.
मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सर्दी ताप खोकल्यासाठी बऱ्याचदा डॉक्टरकडे जाणं टाळतात, जेव्हा जास्त होतं तेव्हा डॉक्टरकडे नेलं जातं. नाहीतर बऱ्याचदा स्वत: औषधं घेऊन किंवा घरगुती उपाय करून किंवा मेडिकलमधून परस्पर औषधं आणून घेतली जातात. मात्र हीच एक चूक जीवावर बेतू शकते. एका कफ सिरपने तब्बल 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या कफ सिरपमुळे 6 मुलांची किडनी फेल झाली असून त्यांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात किडनी निकामी झाल्यामुळे सहा लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धडकी भरवणारी घटना समोर आली. एका चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा ही धक्कादायक बाब उघड झाली. ती चिमुकली एका विशिष्ट कफ सिरपचे सेवन करत होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही. हे प्रकरण उघडकीस येताच प्रशासनाने तात्काळ तपास सुरू केला.
advertisement
हा संपूर्ण प्रकार कसा समोर आला?
20 सप्टेंबरनंतर अशाच पद्धतीने सहा मुलांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या गंभीर अहवालानंतर, छिंदवाडाचे जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह यांनी 'कोल्ड्रिफ' आणि 'नेक्सट्रॉस डीएस कफ सिरप' या दोन औषधांच्या विक्रीवर तातडीने बंदी आणली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तुम्ही ही चूक करत असाल तर तातडीनं कफ सिरप देणं बंद करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी कोणतीही औषधं देऊ नयेत.
advertisement
मुलांमध्ये दिसली लक्षणं?
गेल्या अनेक दिवसांपासून छिंदवाडा परिसरात मुलांमध्ये किडनी निकामी होण्याची रहस्यमय प्रकरणे सातत्याने समोर येत होती. या सर्व मृत मुलांमध्ये एकच लक्षण आढळले. तीव्र ताप आणि लघवी करताना होणारा त्रास. अनेक मुलांना उपचारासाठी तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्यांनाही वाचवता आले नाही. या किडनीच्या 'रहस्यमय' आजाराचे मूळ कारण शोधण्यासाठी दिल्लीहून ICMR आणि भोपाळहून आरोग्य पथके (Teams) घटनास्थळी दाखल झाली, पण मृत्यूचे ठोस कारण सापडत नव्हते.
advertisement
बायोप्सीमुळे समजलं सत्य
ज्या गावांमध्ये हे मृत्यू झाले, तेथील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, पण पाणी दूषित नव्हते. मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या व्हायरोलॉजी संस्थेत तपासणीसाठी पाठवले असता, कोणतेही विषाणूजन्य संक्रमण आढळले नाही. त्यामुळे, ज्या मुलांचा मृत्यू झाला, त्यांच्या किडनीची बायोप्सी करण्यात आली, आणि याच तपासणीत या मृत्यूमागील भयानक सत्य समोर आले. त्या सर्व मुलांच्या किडनीमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल या घातक रसायनाचा अंश आढळला. हा अहवाल मिळताच जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह यांनी तातडीने कफ सिरपवर बंदी घातली आणि पालक, डॉक्टर व मेडिकल स्टोअरसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या, तसेच ICMR च्या पथकाला घटनेची माहिती दिली.
advertisement
मुलांना देताय 'गोड विष'
या कफ सिरपमध्ये आढळलेले डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) किंवा एथिलीन ग्लायकॉल (EG) हे खरंतर अत्यंत विषारी रसायन आहेत. ही रसायने विशेषतः वाहनांच्या कूलंटमध्ये आणि ब्रेक फ्लुइडमध्ये वापरली जातात. मानवी शरीरासाठी ही रसायने अत्यंत धोकादायक आणि विषारी आहेत. तरीही, काही औषध कंपन्या पैशाची बचत करण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून या घटकांचा वापर औषधांमध्ये करतात. कफ सिरप गोड असल्यामुळे लहान मुले ते सहजपणे पितात. पण या घातक रसायनांमुळे ते 'गोड विष' ठरते.
advertisement
किडनी फेल आणि शरीरावरही परिणाम
हे रसायन शरीरात प्रवेश करताच सर्वप्रथम किडनीवर हल्ला करते, ज्यामुळे लघवी थांबते आणि परिणाम गंभीर झाल्यास किडनी पूर्णपणे निकामी होते. जागतिक आरोग्य संघटना (WHO), यू.एस. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आणि भारतीय औषध नियंत्रक यांसारख्या सर्व प्रमुख संस्थांनी या रसायनांचा औषधांमध्ये वापर करण्यावर कठोर बंदी घातलेली आहे. विशेषतः, गाम्बियामध्ये भारतीय कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर WHO ने या सिरपमध्ये DEG असल्याचा इशारा जारी केला होता, आणि 2022 ते 2025 पर्यंत जगात सातत्याने अशा इशारा दिले गेले आहेत, ज्यामुळे ही समस्या आजही गंभीर असल्याचे दिसून येते.
advertisement
भारतात आणि जगभरातही कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत. गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू 'मेडेन फार्मास्युटिकल्स' कंपनीच्या कफ सिरपमुळे झाला होता, ज्यात DEG आणि EG आढळले होते, त्यानंतर या कंपनीच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. इंडोनेशियात देखील 'आफी फर्मा' आणि 'सीव्ही समुद्र केमिकल' या स्थानिक कंपन्यांच्या कफ सिरपमुळे ९९ मुलांचा मृत्यू झाला होता, ज्यात DEG/EG आढळल्यामुळे न्यायालयाने कंपन्यांना दोषी ठरवून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.
कंपनीवर कारवाई कधी?
उझबेकिस्तानमध्येही 'मॅरियन बायोटेक' कंपनीच्या 'डेक-१ मॅक्स' कफ सिरपमुळे २० मुलांचा मृत्यू झाल्यानंतर या सिरपची निर्यात थांबवून सर्व साठा परत मागवण्यात आला होता. भारतातही २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दोन महिन्यांत सहा महिन्यांपेक्षा लहान १२ बाळांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाला होता, त्यानंतर कंपनीवर गुन्हा दाखल झाला होता. हिमाचल प्रदेशातही अशाच कफ सिरपमुळे १३ मुलांचा मृत्यू झाला होता, तर राजस्थानमध्ये अलीकडेच अशाच प्रकारची अनेक प्रकरणे समोर आल्यामुळे औषध नियंत्रक तपासणी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने खोकल्याच्या उपचारासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेण्याचा आणि औषधाचा लेबल तपासण्याचा सल्ला दिला आहे. इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (IAP) ने पालकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मुलांना सिरप न देण्याचा, अनोळखी ब्रँड्स टाळण्याचा आणि WHO ने अलर्ट दिलेल्या ब्रँड्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
या औषधांवर बंदी
भारत सरकारनेही या समस्येवर कठोर पाऊल उचलले आहे. १८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ४ वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या 'अँटी-कोल्ड' (Anti-cold) औषधांच्या संयोजनावर (Combination) बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, DEG आणि EG युक्त सिरपमुळे गाम्बिया, उझबेकिस्तान आणि कॅमरूनसह अनेक देशांमध्ये १४१ मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तसेच २०१९ मध्ये भारतातही १२ मुलांचा मृत्यू आणि ४ मुलांना कायमस्वरूपी अपंगत्व आले होते. त्यामुळे लहान मुलांना औषध देताना पालकांनी अति दक्षता बाळगणे आता अनिवार्य झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 2:15 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Explainer: खोकला येतो म्हणून डॉक्टरांना न विचारता देताय कफ सिरप? 6 मुलांचा मृत्यू, खळबळजनक खुलासा