हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, पण राजीव गांधीवरील हेरगिरीमुळे पडलं होतं सरकार, जुना किस्सा

Last Updated:

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 90 च्या दशकात असाच प्रकार राजीव गांधींसोबत घडला होता. पण त्यामुळे केंद्रातील सरकार पडलं होतं.

राजीव गांधींच्या घराबाहेर दोन पोलिसांनी चहा प्यायल्याचं निमित्त अन् केंद्रातलं सरकार कोसळलं
राजीव गांधींच्या घराबाहेर दोन पोलिसांनी चहा प्यायल्याचं निमित्त अन् केंद्रातलं सरकार कोसळलं
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सपकाळ वास्तव्याला असलेल्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमात साध्या गणवेशातील पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप केला जातोय. संबंधित पोलीस विनापरवाना आश्रमात प्रवेश करून हेरगिरी करत असताना एक पोलीस कर्मचारी निदर्शनास आला. सपकाळांनी त्याच्याकडे विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशाने आपण पाळत ठेवत असल्याचं त्यानी सांगितलं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांवदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला फोन लावून याबाबत जाब विचारला.
पण अशाप्रकारे एखाद्या राजकीय नेत्याची हेरगिरी होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशाच प्रकारे अनेक नेत्यांची हेरगिरी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ९० च्या दशकात तर माजी पंतप्रधान राजीव गांधींची हेरगिरी केल्याने केंद्रातील सरकार कोसळलं होतं. त्यावेळी राजीव गांधीच्या घरासमोर दोन पोलीस साध्या वेशात चहा पिताना आढळले होते. यानंतर हेरगिरीचे आरोप होऊन भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचं सरकार पडलं होतं. त्यावेळी नेमकं काय झालं होतं? याचीच माहिती या लेखातून घेऊयात....
advertisement

हेरगिरीमुळे सरकार कसं पडलं?

1990 चं दशक. हा काळ भारतासाठी अत्यंत कसोटीचा काळ होता. देशात राजकीय अस्थिरता, दहशतवाद आणि सामाजिक अशांतता पसरली होती. भारतीय राजकारणाची आणि समाजकारणाची दिशा बदलवणारे अनेक महत्त्वाचे निर्णय याच काळात घेण्यात आले. देश नुकताच आणीबाणीतून मुक्त झाला होता. लोकांनी दडपशाहीच्या कळा सोसल्या होत्या. पण हा काळ लक्षात राहिला तो म्हणजे या दशकात बदलेली चार सरकारं. दहा वर्षांच्या काळात भारताने तब्बल चार पंतप्रधान बघितले होते. देशात प्रचंड राजकीय अस्थिरता होती. अशात भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर याचं सरकार तर केवळ दोन पोलिसांमुळे पडलं होतं. हे दोन्ही पोलीसवाले तत्कालीन विरोधी पक्षनेते राजीव गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर चहा पीत उभे होते.
advertisement

राजीव गांधींच्या घराबाहेर दोन पोलिसांनी चहा प्यायला अन् सरकार पडलं

पोलिसांनी एखाद्या नेत्याच्या घराबाहेर चहा पित उभा राहणं, तशी सामान्य बाब वाटत असली तरी यामागे मात्र भयंकर कट होता. या कटाची कुणकुण जेव्हा राजीव गांधींना लागली. तेव्हा याचे असे पडसाद उमटले की थेट केंद्रातील चंद्रशेखर याचं सरकार पडलं. ही गोष्ट आहे, मार्च 1991 मधली. त्यावेळी राजीव गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानाबाहेर दोन हरियाणा पोलीस चहा पिताना आढळले होते. काँग्रेसच्या आरोपानुसार, हे दोन्ही पोलीस साध्या वेशात राजीव गांधींच्या घराबाहेर थांबले होते. दोघंही हरियाणा सीआयडीचे पोलीस कर्मचारी होते. ते राजीव गांधींवर हेरगिरी करत होते. वरंवर पाहता काँग्रेसचा हा आरोप कानाडोळा करण्यासारखा वाटत असेल. मात्र ही घटना अत्यंत गंभीर होती. याचं कारण म्हणजे या घटनेआधी 1985 मध्ये भारतात घडलेलं मोठं हेरगिरी कांड.
advertisement

1985 मधील भारतातील हेरगिरी कांड

ही हेरगिरी थेट भारत सरकारच्या उच्च-पदस्थ अधिकाऱ्यांकडून केली जात हेती. हे अधिकारी परदेशी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती पुरवत होते. या प्रकरणात, पीसी अलेक्झांडर यांचे खासगी सचिव टी.एन. कुट्टी यांना अटक करण्यात आली होती. कुट्टी हे फ्रेंच आणि सोव्हिएत गुप्तहेरांना गोपनीय माहिती विकत असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पीसी अलेक्झांडर यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता. हे प्रकरण ताजं असताना राजीव गांधी यांच्यावर अशाप्रकारे हेरगिरी सुरू असल्याने या हेरगिरीला देखील तितकंच महत्त्व होतं.
advertisement
या हेरगिरीचा वाद पुढे इतका वाढला की, केंद्रातील सरकार पडलं. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चंद्रशेखर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष होता, तरीही काँग्रेसला सत्तेबाहेर राहावं लागलं होतं. अशा स्थितीत हे हेरगिरी प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसनं चंद्रशेखर यांचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्याचं सरकार कोसळलं.
advertisement

1989 ची राजकीय समीकरणं

आता चंद्रशेखर आणि राजीव गांधीच्या कथित हेरगिरीचं कनेक्शन समजून घेण्याआधी आपल्याला तत्कालीन राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. तर तेव्हा 1989 ची निवडणूक ही काँग्रेससाठी अत्यंत वादळी ठरली होती. बोफोर्स घोटाळा, विश्वनाथ प्रताप सिंह यांनी केलेला बंड आणि पंजाबमधील दहशतवाद, खलिस्तानची मागणी अशा सगळ्या घडामोडींमुळे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यांना बहुमतापेक्षा खूपच कमी 197 जागा मिळाल्या. स्वबळावर सत्तेत येणं काँग्रेसला अशक्य होतं.
advertisement
अशा स्थितीत जनता दल (143 जागा), भाजप (85) आणि डाव्या पक्षांनी (52) एकत्र येऊन व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. पण हे सरकार फार काळ टिकलं नाही. भाजपने पाठिंबा काढून घेतला. यानंतर जनता दलाचे वजनदार नेते चंद्रशेखर पक्षातून बाहेर पडले. पण ते पक्षातून बाहेर जाताना स्वत:सोबत 64 खासदारांना घेऊन गेले. यानंतर त्यांनी समाजवादी जनता पक्षाची स्थापना केली. व्ही पी सिंह यांचं सरकार एका वर्षापेक्षा कमी कालावधीत कोसळलं.
ही राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन राजीव गांधींनी मोठा डाव खेळला होता. जनता पक्षातून बाहेर पडलेल्या चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदी बसवलं. स्वत:कडे 197 खासदार असूनही त्यांनी 64 खासदारांचा पाठिंबा असलेल्या चंद्रशेखर यांना पीएम केलं. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण या कथित हेरगिरीमुळे राजीव गांधी प्रचंड संतापले. त्यांनी चंद्रशेखर यांच्या सर्व सूचना धुडकावून लावल्या. चंद्रशेखर यांनी हेरगिरी प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण याचा फारसा फायदा झाला नाही.

चंद्रशेखर आणि हेरगिरीचं कनेक्शन काय?

तर, चंद्रशेखर यांचा या कथित हेरगिरीशी थेट संबंध नव्हता. पण राजीव गांधींच्या घराबाहेर आढळलेले दोन्ही पोलीस हरियाणातील सीआयडी पथकाचे होते. त्यावेळी हरियाणात समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते ओम प्रकाश चौटाला यांचं सरकार होतं. यावरून काँग्रेसने असा निष्कर्ष काढला की ही कथित हेरगिरी चंद्रशेखर यांच्या सांगण्यावरून चौटाला यांनी केली असावी. हा निष्कर्ष सत्य मानून काँग्रेसनं चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

ओम प्रकाश चौटालांच्या भावाने राजीव गांधींना टीप दिली

यावरून त्यावेळी विविध अफवा पसरल्या होत्या. हरियाणाच्या राजकीय वर्तुळात एक अफवा अशी होती की, चौटाला हे राजीव गांधींची हेरगिरी करत आहेत, याची माहिती चौटाला यांचे वेगळे झालेले भाऊ रणजीत सिंह यांनी फोडली होती. त्यांनीच राजीव गांधींना अलर्ट केलं होतं. रणजीत सिंह हे वडील देवीलाल यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे तेही हरियाणातील मोठे प्रस्थ होते. त्यांनी कथित हेरगिरीची माहिती देण्यासाठी स्वतःच्या नेटवर्कचा वापर केला होता.

...अन् चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला

राजीव गांधींकडे काहीतरी ठोस पुरावे होते, त्यामुळेच त्यांनी चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं सांगितलं जातं. यानंतर 6 मार्च 1991 रोजी चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे जून महिन्यात संसद आणि इतर काही राज्यांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आणि हे हेरगिरी प्रकरण मागे पडलं. याचा कोणत्याही सरकारने पाठपुरावा केला नाही किंवा तळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, पण राजीव गांधीवरील हेरगिरीमुळे पडलं होतं सरकार, जुना किस्सा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement