Independence Day: गाण्यांतून पेटवली देशभक्तीची ज्वाला, कोण होते सांगलीतील शंकरराव निकम? VIDEO
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Independence Day: सातारा जिल्ह्यातील प्रती सरकारच्या चळवळीत जनमानसात स्फूर्ती निर्माण करण्यात शंकररावांचा मोठा वाटा होता. शंकरराव निकम यांनी आपल्या जीवनात अतोनात कष्ट भोगले होते.
प्रीती पाटील, प्रतिनिधी
सांगली: भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिर्घकाळ चालला होता. याच स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चालवत जुना सातारा आणि सध्याच्या सांगली, साताऱ्यातील कित्येक लोक देशभक्तीने पेटून उठले होते. स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचा देखील अशा देशभक्तांमध्ये समावेश होतो. डफावर थाप देत स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या कलेने जनजागृती केलेले शंकरराव निकम कोण होते? याबाबत लोकल 18 जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
शाहीर शंकराव निकम हे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे रहिवासी होते. ते शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. 1942च्या क्रांतियुद्धात डफ हातात घेऊन सुरेल आवाजात आपल्या गीतांनी त्यांनी सातारा, सांगली जिल्ह्यांतील जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. काही काळ त्यांनी विदर्भातही काम केलं होतं. एक प्रतिभावान गीतकार, निष्ठावान देशभक्त आणि क्रांतिकारक असा त्यांचा लौकिक आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यातील प्रती सरकारच्या चळवळीत जनमानसात स्फूर्ती निर्माण करण्यात शंकररावांचा मोठा वाटा होता. शंकरराव निकम यांनी आपल्या जीवनात अतोनात कष्ट भोगले होते. राजकीय बंदिवासाच्या काळात एक निष्ठावान देशभक्त म्हणून त्यांनी सहन केलेले कष्ट अवर्णनीय आहेत, अशी माहिती प्रतिसरकारचे अभ्यासक प्राचार्य दिनकर पाटील यांनी दिली.
advertisement
प्रतिसरकारमधील विश्वासू सहकारी
शाहीर शंकरराव निकम हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांच्या शाहिरी गीतांतून समाज प्रबोधन आणि देशभक्तीची मूल्ये पसरत असल्याने ते प्रतिसरकारमध्ये प्रचार मंत्री म्हणून कार्यरत होते. शाहीर निकम यांनी गांधी पद्धतीने विवाह केला होता.
"कसाबांचे हाती, सापडल्या गाई काण त्या सोडवी, पांडुरंगा कोण आहे वाली, अनाथांचा ईस चालला जल्लोष, मर्कटांचा" अशा शब्दरचनेतून समाजाचे वास्तव मांडणारे शाहिर निकम लोकांचं प्रबोधन करत असत. प्रतिसरकारच्या सभेची सुरुवात त्यांच्या पोवाडा गायनाने होत असे, अशी माहिती त्यांच्या कन्या कांचन पाटील यांनी दिली.
advertisement
त्यांनी हुंडाबंदी, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रौढशिक्षण वर्ग देखील त्यांनी चालवले. ना. सी. फडके यांची 'झंजावात' कादंबरी आणि ग. दि. माडगूळकरांच्या 'मंतरलेले दिवस' कादंबरीमध्ये शाहीर शंकरराव निकम यांच्या कार्याचा उल्लेख आढळतो.
'सांगतो ऐका ज्ञानेश्वरी' या ग्रंथातून शंकरराव निकम यांचे विचार आणि शाहिरी गीतं प्रकाशित झालेली आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या गीतांनी समाज प्रबोधन करणारे स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम निष्ठावान देशभक्त होते.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
August 15, 2025 3:37 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
Independence Day: गाण्यांतून पेटवली देशभक्तीची ज्वाला, कोण होते सांगलीतील शंकरराव निकम? VIDEO


