Dombivli Road: डोंबिवलीत पुन्हा रस्ते झाले हिरवे, नेमका प्रकार काय? नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
डोंबिवलीकरांना वारंवार प्रदूषणाचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये गुलाबी रस्त्यांचं दर्शन झाल्यानंतर आता नागरिकांना हिरव्या रंगाच्या रस्त्यांचं दर्शन झालं आहे.
डोंबिवली: डोंबिवलीकरांना वारंवार प्रदूषणाचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच डोंबिवली एमआयडीसीमध्ये चक्क रस्ते गुलाबी रंगाचे झालेले पाहायला मिळाले होते. आता त्यानंतर डोंबिवलीमध्ये हिरव्या रंगाचे रस्ते पाहायला मिळालेले आहेत. तिथले नागरिक वारंवार प्रशासनाकडे तिथल्या दुर्गंधी संबंधित तक्रार दाखल करत आहेत, तरीही देखील तिथले अनेक कारखाने आणि कंपन्या अनधिकृत रित्या केमिकल बाहेर सोडताना दिसत आहेत. अशातच तिथल्या नागरिकांना आता पुन्हा एकदा रासायनिक प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील पिंपळेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या नाल्यातून रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे रंगीत वाहताना दिसत आहे. यावेळी नाल्यातून हिरव्या रंगातून रासायनिक मिश्रित पाणी थेट रस्त्यावर वाहताना पाहायला मिळत आहे. या पाण्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून पुन्हा एकदा नागरिकांच्या तब्येतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गटारातून वाहत असलेल्या हिरव्या रंगाच्या पाण्यातून घाणेरडा आणि उग्र वास यातून येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. शिवाय, रस्त्यावर साचलेल्या पाण्याचाही त्रास डोंबिवलीकरांना होत आहे.
advertisement
रंगीत पाण्यामुळे डोंबिवलीकरांना आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची भीती व्यक्त केली आहे. श्वासोच्छवासाच्या समस्याही नागरिकांना उद्भवू लागले आहे. शिवाय, पाण्याच्या उग्र वासामुळे नागरिकांना नाक बंद करूनच प्रवास करावा लागत आहे. गटारातून वाहत असलेल्या हिरव्या पाण्याची दखल महानगर पालिकेने, राज्य शासनाने, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानेही घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. शिवाय, दोषींवर कडक कारवाई केली जाण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. डोंबिवलीकरांसाठी रंगीत पाणी, रस्ते आणि रंगीत पाऊस हा प्रकार काही नवीन नाही यापूर्वी सुद्धा अनेकदा त्यांनी या गोष्टी पाहिलेल्या आहेत.
advertisement
डिसेंबर 2025 मध्ये सुद्धा डोंबिवलीतील रस्ता गुलाबी रंगाचा झालेला पाहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांतून मोठ्या प्रमाणावर केमिकल्स बाहेर पडते, ज्याचा थेट परिणाम नागरिकांवर होतोय. डिसेंबर महिन्यामध्ये डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यावर गुलाबी रंगाचे केमिकल साचले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातही मोठ्या प्रमाणात ते केमिकल आढळले होते. त्या केमिकलमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत होते.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 6:39 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli Road: डोंबिवलीत पुन्हा रस्ते झाले हिरवे, नेमका प्रकार काय? नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण









