Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाचा कहर; डोंगर खचला, गावाशी संपर्क तुटला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
कोकणात पावसाचा जोर वाढला आहे, पावसामुळे डोंगर खचल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरी, शिवाजी गोरे, प्रतिनिधी: कोकणात पावसाचा जोर वाढला आहे, रत्नागिरी जिल्ह्यात तर पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे डोंगर खचल्याची घटना घडली आहे. दोन जिल्हे आणि चार तालुक्यांच्या सीमेवर असलेला देवाचा डोंगर खचल्यानं 'देवाचा डोंगर' गावाशी संपर्क तुटला आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारी डोंगर खचला होता, रस्त्यावरील दगड हटवण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा रात्री पावसामुळे दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, देवाचा डोंगर गावाचा संपर्क तुटला आहे. डोंगराचा भाग कोसळून दगडं रस्त्यावर येत असल्यानं हा रस्ता धोकादायक बनला आहे.
समुद्र सपाटीपासून सुमारे 2 हजार फूट उंचीवर असलेल्या देवाचा डोंगर गावाकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला आहे. कोकणात मंगळवारी रात्री पासून कोसळत असलेल्या पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या देवाचा डोंगर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उंच डोंगराची दरड कोसळून रस्ता वाहतुकीला बंद झाला आहे. देवाचा डोंगर घाटात दरड कोसळली होती, दरड हटवण्याचे काम कालपर्यंत सुरू होते. मात्र रात्री पुन्हा दरड कोसळल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रत आज काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसासोबतच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
June 26, 2024 7:12 AM IST


