Cervical Cancer : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण का वाढतंय ? HPV लस घेणं का आवश्यक ? HPV लसीकरण कधी करायचं ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या सुमारे पंचवीस टक्के रुग्ण आढळतात. आकडेवारीनुसार, दर काही मिनिटांनी, देशात एका महिलेचा या आजारानं मृत्यू होतो. एचपीव्ही लसीकरण व्यापक करणं हे कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
मुंबई : गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते रुग्ण ही जगभरातली गंभीर चिंतेची बाब आहे. तरुण महिलांमधे याचं प्रमाण वेगानं वाढतंय. यावर ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीनं, देशभरातील महिलांच्या संरक्षणासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध सरकार लसीकरण मोहीम सुरू करत आहे.
या उपक्रमांतर्गत, चौदा वर्षांच्या मुलींना एचपीव्ही लस मोफत दिली जाईल. गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्ध हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. अहवालांनुसार, भारतात दरवर्षी अंदाजे 1.15 कोटी मुली चौदा वर्षांच्या होतात.
गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते रुग्ण - भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या सुमारे पंचवीस टक्के रुग्ण आढळतात. आकडेवारीनुसार, दर काही मिनिटांनी, देशात एका महिलेचा या आजारानं मृत्यू होतो. एचपीव्ही लसीकरण व्यापक करणं हे कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
advertisement
ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा एक सामान्य संसर्ग आहे. स्किन टू स्किन हा संसर्ग पसरतो आणि सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणं दिसत नाहीत. HPV च्या स्ट्रेनचा संसर्ग बराच काळ टिकला तर तो हळूहळू कर्करोगात बदलू शकतो.
advertisement
National Health Mission म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानात वापरल्या जाणाऱ्या क्वाड्रीव्हॅलेंट लसीमुळे HPV टाईप 16 आणि 18 पासून संरक्षण होतं. या दोन प्रकारांमुळे, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढतंय.
डॉक्टरांच्या मते, ही लस केवळ गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचंच नाही तर गुद्द्वार, योनी, लिंग आणि घशाच्या काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. ही लस विषाणूच्या संपर्कात येण्यापूर्वी दिली गेली तर ती गर्भाशयाच्या कर्करोगापासून आणि संबंधित कर्करोगापूर्वीच्या परिस्थितींपासून अंदाजे 97 टक्के संरक्षण देऊ शकते. लसीकरणानंतर किमान 12 ते 15 वर्षे मजबूत प्रतिकारशक्ती टिकून राहते असं संशोधनातून दिसून आलं आहे.
advertisement
9 ते 14 वयोगटातील मुली - किशोरावस्थेत ही लस सर्वात प्रभावी असते, म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुली हे प्राथमिक लक्ष्य असतात. 15 ते 26 वयोगटातील महिलांना कॅच-अप लसीकरणाची शिफारस केली जाते, तर 27 ते 45 वयोगटातील पुरुष आणि महिला डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर लसीकरण करू शकतात. संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलांचा समावेश करण्यावरही भर दिला जात आहे.
advertisement
एचआयव्ही बाधित ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांनी लसीकरण करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू
मिंटच्या अहवालानुसार, भारतातील महिलांमधे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे.
दरवर्षी अंदाजे 80,000 नवीन रुग्णांचं निदान होतं आणि 42,000 हून अधिक महिलांचा या आजारानं मृत्यू होतो. वैज्ञानिक पुराव्यांनुसार, मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) चा सतत संसर्ग गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या जवळजवळ सर्व प्रकरणांसाठी जबाबदार आहे. विशेषतः एचपीव्ही प्रकार 16 आणि 18 हे हाय रिस्क मानले जातात, याचे भारतात 80 टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत.
advertisement
एचपीव्ही लस किती प्रभावी ?
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, एचपीव्ही लस ही जगातील सर्वात जास्त अभ्यासलेल्या लसींपैकी एक आहे. ही लस त्यात समाविष्ट असलेल्या HPV प्रकारांमुळे होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे असं संशोधनातून दिसून आलं.
ही लसीकरण केंद्रं चोवीस तास सुरू असलेल्या सरकारी आरोग्य सुविधांशी जोडली जातील, जेणेकरून गरज पडेल तेव्हा त्वरित आरोग्यसेवा उपलब्ध होईल. यामुळे सुरक्षा मानकं मजबूत होण्यासाठी आणि पालकांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 7:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cervical Cancer : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण का वाढतंय ? HPV लस घेणं का आवश्यक ? HPV लसीकरण कधी करायचं ?






