Konkan Railway : बाप्पांच्या विसर्जनानंतर परतीचा प्रवास सुरू; सावंतवाडी स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी

Last Updated:

Kokan News : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर कोकणवासीयांची मुंबई, पुण्याकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. अंतचतुर्दशीनंतर हजारो भाविकांनी आपल्या गावी निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरू केला आहे.

News18
News18
राज्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. 27 ऑगस्ट रोजी बाप्पांची घरोघरी प्रतिष्ठापना झाली होती. पाच दिवसांच्या गणपतींनंतर आणि दहा दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर अखेर काल अंतचतुर्दशीला भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला डोळ्यात अश्रू घेऊन निरोप दिला. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह इतर शहरांतून कोकणात गेलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतील प्रमुख स्थानकांसह विशेषतहा सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे.
गणेशोत्सवाचा आनंद यंदा कोकणात अधिक खुलून आला होता. पावसाच्या सरी, हिरवेगार डोंगर, डोलकाठीसह गावागावांत झालेल्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-कीर्तनाच्या गजराने उत्सवाला एक वेगळेच रूप प्राप्त झाले. प्रत्येक वाड्यात, प्रत्येक गावात बाप्पांची सजलेली मंडपं आणि भाविकांचा उत्साह यामुळे कोकणभरात उत्सवी वातावरण होते. मात्र, उत्सव संपल्यानंतर आता चाकरमानी मुंबई-पुण्याकडे परतण्याच्या तयारीला लागले आहेत.
advertisement
सावंतवाडी स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी रेलचेल दिसत आहे. तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागल्या असून अनेकांना गाड्यांचे नियमित तिकीट मिळाले नाही. त्यामुळे काहींना एजंटकडून दुप्पट-तिप्पट दराने तिकीट घ्यावे लागत आहे, तर काही प्रवाशांनी खासगी बस, रिक्षा किंवा इतर पर्यायी मार्ग स्वीकारले आहेत. आरक्षित आसनांची कमतरता असल्याने बऱ्याच प्रवाशांना डब्यात उभे राहून प्रवास करावा लागत आहे. काहींना तर प्लॅटफॉर्मवर तासन्तास गाडीची प्रतीक्षा करताना त्रास सहन करावा लागतो आहे.
advertisement
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली आहेत. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या वतीने अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टेशन परिसरात अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. तरीही प्रवाशांच्या प्रचंड संख्येमुळे परिसर गजबजलेला दिसत आहे.
गर्दी, तिकीटांची कमतरता, लांबचा प्रवास अशा अडचणी असूनही चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. कारण मागील काही दिवस त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पासोबत, कुटुंबीयांसह आणि गावातील आप्तेष्टांसोबत घालवलेले आहेत. त्या आठवणी आणि आनंदच त्यांच्यासाठी खरी ऊर्जा ठरते. आता ते पुन्हा कामधंद्यासाठी शहरांकडे परतणार असले तरी त्यांच्या मनात पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरता आधीच सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Konkan Railway : बाप्पांच्या विसर्जनानंतर परतीचा प्रवास सुरू; सावंतवाडी स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement