मेथीचे लाडू अजिबात लागणार नाहीत कडू! पौष्टिक रेसिपी बनवायची कशी?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Healthy Food: हिवाळ्यात अनेकजण मेथीचे आरोग्यदायी लाडू बनवतात. परंतु, काहींना त्यांच्या कडूपणामुळे ते आवडत नाहीत. पण खास पद्धतीनं लाडू बनवल्यास ते अजिबात कडू होणार नाहीत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे: हिवाळ्यात अनेक जण आपल्या घरी डिंकाचे, मेथीचे पौष्टिक लाडू बनवतात. हे लाडू शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. परंतु, घरातील काहींना लाडूच्या कडवट चवीमुळे ते अजिबात आवडत नाहीत. बऱ्याचदा लाडू पौष्टिक असले तरी लहान मुले त्यांच्याकडे पाहतही नाहीत. पण काहीजण मेथीचे लाडू गोड आणि अगदी परफेक्ट बनवतात. त्यामुळे न खाणाऱ्यांनाही ते आवडू शकतात. ठाणे येथील गृहिणी शुभांगी चव्हाण यांनी अशाच लाडूंची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
मेथीचे आरोग्यासाठी फायदे
मेथी ही आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानली जाते. ऍनिमिया कमी करण्यासाठी मेथी उपयुक्त ठरते. त्यात फायबरचे प्रमाणही अधिक असते. अपचन, ऍसिडिटी, पोट साफ न होणाऱ्यांसाठी मेथी अत्यंत लाभदायी असते. तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मेथी लाभदायी आहे. तसेच मेथीचे सौंदर्याच्या दृष्टीनेही फायदे आहेत. मात्र, कडवट चवीमुळे अनेकजण मेथी खाणे टाळतात. तेव्हा मेथीचे लाडू खाणे हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
मेथीचे लाडू बनवण्यासाठी साहित्य
मेथीचे लाडू बनवण्यासाठी तुम्ही गरजेनुसार साहित्या वापरू शकता. त्यासाठी अर्धा वाटी मेथी, एक वाटी बेसन, एक वाटी रवा, अर्धा वाटी हलीम, गुळ एक वाटी, किसलेला जायफळ, थोडं खोबरं, एक वाटी डालडा आणि किसलेले काजू आणि बदाम लागतील.
advertisement
लाडू बनवण्याची कृती
सर्वप्रथम रवा, बेसन आणि मेथी व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर रवा, बेसन आणि मेथी एकत्र करा. तुम्हाला जितका कडवटपणा हवा असेल तेवढच अंदाजाने मेथी टाका. आता या मिश्रणात हलीम, एक वाटी गूळ, थोडं खोबरं टाकून पुन्हा मिश्रण एकजीव करावे. त्यानंतर या मिश्रणात पोट खराब होऊ नये यासाठी किसलेल जायफळ आणि चवीसाठी किसलेले काजू आणि बदाम घालावे. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
advertisement
या मिश्रणात शेवटी वितळलेलं वनस्पती तूप किंवा साजूक तूप घालू शकता. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित हालवून घ्या आणि त्याचे गोल लाडू वळून घ्या. अशाप्रकारे आपले लाडू तयार होतील. अगदी सोपी आणि पौष्टिक रेसिपी आपण आपल्या घरीही ट्राय करू शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 10, 2024 4:45 PM IST