साई संस्थानकडून भाविकांसाठी खास भेट, सामान्य दर्शन रांगेतील पहिल्या दोन भक्तांना मिळणार आरतीचा मान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
साई संस्थानच्या या निर्णयाने भक्तांसाठी नववर्षाचा शुभारंभ अधिक खास झाला आहे. हा उपक्रम भक्त आणि देवाच्या नात्यात अधिक निकोपता आणि विश्वास निर्माण करणारा ठरेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने नववर्षाच्या सुरुवातीलाच साईभक्तांना एक आगळीवेगळी भेट दिली आहे. आता रोजच्या आरतीमध्ये सामान्य दर्शन रांगेतील पहिल्या दोन भक्तांना सन्मानपूर्वक साई समाधीजवळ उभे राहून आरती करण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय साई संस्थानने वारकऱ्यांच्या परंपरेचा आदर्श घेऊन घेतला असून यामुळे भक्तांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
वारकऱ्यांच्या परंपरेवर आधारित निर्णय
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांतील पहिल्या दोन भक्तांना मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांसोबत पूजेसाठी पुढे जाण्याचा मान दिला जातो. याच पद्धतीचा अवलंब साई संस्थानने करत रांगेतील पहिल्या दोन भक्तांना साईबाबांच्या समाधीसमोर आरतीसाठी उभे राहण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रोजच्या मध्यान्ह आरती, धुपारती आणि रात्रीच्या शेजारतीमध्ये ही संधी दिली जाईल, असं साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
advertisement
आरतीसाठी निवड प्रक्रिया
आरतीपूर्वी अर्धा तास दर्शन रांग बंद केली जाते. यावेळी जे दर्शन रांगेत पहिल्या स्थानावर असतील त्यांपैकी दोन भक्तांची निवड केली जाईल. त्यांना संस्थानच्या अधिकाऱ्यांद्वारे सन्मानाने साई समाधीजवळ नेले जाईल आणि आरतीत सहभागी होण्याचा मान दिला जाईल.
advertisement
पहिल्या आरतीचा मान झाशीच्या भक्तांना
नववर्षाच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशातील झाशी येथील मनीष रजक आणि पूजा रजक हे दाम्पत्य साई संस्थानच्या या निर्णयाचे पहिले मानकरी ठरले. सकाळी सात वाजता दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर साडेअकराच्या सुमारास संस्थानच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सन्मानपूर्वक आरतीसाठी नेले. खरं तर ही अनपेक्षित घटना म्हणावी लागेल. साई समाधीजवळ आरतीत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आमचे जीवन कृतार्थ झाले अशी भावना रजक दाम्पत्याने व्यक्त केली.
advertisement
भाविकांमध्ये आनंदाचा उत्साह
या निर्णयामुळे साईभक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे. सामान्य भक्तांनाही समाधीसमोर आरती करण्याचा मान मिळणार असल्याने हा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अनेक भक्तांनी संस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
साई संस्थानचे उद्दिष्ट
साई संस्थानने वारंवार भक्तांच्या भावनांचा आदर केला आहे आणि त्यांना समाधीच्या सान्निध्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. हा नवा उपक्रम भक्तांच्या सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांचीच पावती आहे.
advertisement
नववर्षाची खास सुरुवात
साई संस्थानच्या या निर्णयाने भक्तांसाठी नववर्षाचा शुभारंभ अधिक खास झाला आहे. हा उपक्रम भक्त आणि देवाच्या नात्यात अधिक निकोपता आणि विश्वास निर्माण करणारा ठरेल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
January 02, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
साई संस्थानकडून भाविकांसाठी खास भेट, सामान्य दर्शन रांगेतील पहिल्या दोन भक्तांना मिळणार आरतीचा मान