Pink Vs Blue color : मुलींना गुलाबी आणि मुलांना निळा रंग का आवडतो? रंगांची ही विभागणी का आणि कशी झाली?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Why pink for girls and blue for boys : गुलाबी आणि निळ्या रंगांची ही ओळख कशी तयार झाली, ती कधी बदलली आणि आज ती इतकी घट्ट कशी रुजली, हे जाणून घेणं खूप रंजक आहे.
मुंबई : आज आपल्याला गुलाबी रंग म्हणजे मुली आणि निळा रंग म्हणजे मुलं, ही कल्पना अगदी नैसर्गिक वाटते. कपडे, खेळणी, शाळेच्या वस्तू किंवा अगदी वाढदिवसाची सजावटसुद्धा याच रंगांभोवती फिरताना दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ही रंगांची विभागणी कायमपासून अशी नव्हती? खरं तर ही संकल्पना समाजाने आणि बाजारपेठेने हळूहळू तयार केलेली आहे.
रंगांना लिंगाशी जोडण्यामागे विज्ञानापेक्षा संस्कृती, इतिहास आणि मार्केटिंगचा मोठा वाटा आहे. गुलाबी आणि निळ्या रंगांची ही ओळख कशी तयार झाली, ती कधी बदलली आणि आज ती इतकी घट्ट कशी रुजली, हे जाणून घेणं खूप रंजक आहे.
पूर्वीच्याकाळी कशी होती फॅशन?
19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जगाची विचारसरणी आजपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात मुलं आणि मुली यांच्या रंगांबाबत ठरावीक नियम नव्हते. अनेक ठिकाणी दोघांनाही पांढऱ्या किंवा फिकट रंगांचे कपडे घातले जात. कारण ते स्वच्छ ठेवणं सोपं मानलं जात होतं.
advertisement
त्या काळातील फॅशन तज्ज्ञांच्या मते, गुलाबी रंग हा लाल रंगाचाच सौम्य प्रकार होता. लाल रंग जोश, ताकद, धैर्य आणि आक्रमकतेचं प्रतीक मानला जायचा. त्यामुळे गुलाबी रंगाला ‘मर्दानी’ छटा असल्याचं समजलं जात होतं आणि तो मुलांसाठी अधिक योग्य मानला जात होता.
याच्या अगदी उलट, निळा रंग शांतता, कोमलता आणि पवित्रतेचं प्रतीक मानला जायचा. ख्रिश्चन परंपरेत व्हर्जिन मेरीच्या वस्त्रांशी निळ्या रंगाचा संबंध जोडला जात असल्यामुळे तो स्त्रीत्व, सौम्यता आणि निष्पापतेशी जोडला गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी निळा रंग मुलींसाठी योग्य मानला जात होता.
advertisement
रंगांची विभागणी का आणि कशी झाली?
हा बदल एका रात्रीत झाला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जग पुन्हा उभं राहत असताना मोठ्या फॅशन कंपन्या आणि अमेरिकन रिटेलर्सनी एक गोष्ट ओळखली. रंगांच्या आधारे वस्तू वेगळ्या केल्या तर विक्री मोठ्या प्रमाणात वाढू शकते. हीच या बदलाची सुरुवात ठरली.
उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबाकडे आधीपासून निळ्या रंगाचे कपडे किंवा खेळणी असतील आणि दुसरं बाळ मुलगी झाली, तर तेच सामान वापरता येईल. पण जर समाजात आणि जाहिरातींतून 'मुलींसाठी गुलाबीच योग्य' ही कल्पना पक्की केली, तर पालकांना नवीन वस्तू घ्याव्याच लागतील. या विचारातूनच रंग आणि लिंग यांची घट्ट सांगड घातली गेली.
advertisement
1940 च्या दशकानंतर जाहिराती, मासिकं आणि हॉलीवूड चित्रपटांनी या संकल्पनेला अधिक बळ दिलं. ख्रिश्चियन डायरसारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी महिलांसाठी गुलाबी रंगाचे भव्य कलेक्शन सादर केले आणि गुलाबी रंग हळूहळू स्त्रीत्वाचं प्रतीक बनला.
यानंतर दुकानांचे रॅक वेगळे झाले, खेळण्यांचे विभाग विभागले गेले आणि समाजाने नकळतपणे या रंगांच्या चौकटी स्वीकारल्या. लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या रंगांवरून ओळख ठरवायला शिकवलं गेलं. मात्र विज्ञान सांगतं की, दोन वर्षांखालील मुलांमध्ये रंगांबाबत कोणतीही लिंगाधारित आवड नसते. म्हणजेच गुलाबी आणि निळ्याची ही विभागणी नैसर्गिक नसून समाजाने तयार केलेली आहे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 9:48 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pink Vs Blue color : मुलींना गुलाबी आणि मुलांना निळा रंग का आवडतो? रंगांची ही विभागणी का आणि कशी झाली?










