Bhiwandi News: झोपेतच अंगावर मृत्यू कोसळला, भिवंडीत इमारत कोसळून 8 महिन्यांच्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
भिवंडीत शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक धोकादायक दोन मजली इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुनिल घरात, ठाणे 03 सप्टेंबर : भिवंडी शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पावसाळ्यामध्ये इमारत कोसळण्याच्या अनेक घटना इथे पाहायला मिळतात. अशातच भिवंडीत शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक धोकादायक दोन मजली इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जणांना ठिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात भिवंडी अग्निशामक दलाला यश आलं आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
शहरातील गौरीपाडा धोबी तलाव येथील साहिल हॉटेल परिसरात असलेली अब्दुल बारी जनाब इमारत ही 40 वर्षांहून जुनी धोकादायक इमारत आहे. तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना तर त्यावरील दोन मजले निवासी वापर आहे. या इमारतीच्या मागील बाजूचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील कुटुंब या ठिगाऱ्याखाली दबलं गेलं.
advertisement
स्थानिक नागरिकांसह भिवंडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठिगाऱ्याखालून एकूण सात जणांना बाहेर काढलं. त्यापैकी तस्निम कौसर मोमीन (वय 8 महिने) आणि उझ्मा अब्दुल लतिफ मोमीन (वय 40 वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अब्दुल लतिफ मोमीन (वय 65 वर्ष) , फरजान लतिफ मोमीन (वय 50 वर्ष), बुशरा आतिफ मोमीन (वय 32 वर्ष), अदीमा लतिफ मोमीन (वय 7 वर्ष), उरूसा अतिफ मोमीन (वय 3 वर्षे) हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी अब्दुल लतिफ मोमीन यांची प्रकृती गंभीर असून अदीमा लतिफ मोमीन आणि उरूसा अतिफ मोमीन या दोघी लहान मुली किरकोळ जखमी आहेत.
advertisement
घटनास्थळी रात्री उशिरा पालिका आयुक्त अजय वैद्य दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. नक्की इमारत धोकादायक होती का? यावर काय कारवाई केली होती? याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 03, 2023 8:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi News: झोपेतच अंगावर मृत्यू कोसळला, भिवंडीत इमारत कोसळून 8 महिन्यांच्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू