अब्दुल सत्तारांनी महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, भाजप कार्यकर्ते संतापले, गोमुत्र शिपडलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरच्या रहिमाबादमधील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह होता. राज्याचे माजी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या मंदीर दर्शनानंतर हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या कृतीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्तारांच्या दर्शनानंतर काही तरुणांनी मंदिर 'शुद्ध' केल्याचा दावा केलाय, तर भाजपने त्यांना धर्म स्वीकारण्याचं आव्हान दिलंय.
छत्रपती संभाजीनगरच्या रहिमाबादमधील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह होता. राज्याचे माजी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. मात्र, सत्तारांचं हे दर्शन काही तरुणांना रुचलं नाही. सत्तार निघून गेल्यानंतर काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं आणि 'शुद्धीकरण' केल्याचा दावा केला.
सत्तारांच्या मांसाहार करण्याच्या सवयीचा हवाला देत, त्यांनी मंदिर अपवित्र झाल्याचा आरोप केला आणि या प्रकरणाला धार्मिक वळण लागलं. मंदिर स्वच्छ करणारे भाजप कार्यकर्तेच होते अशी कबुली भाजप तालुका अध्यक्षांनी दिली.
advertisement
अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारलाय काय?
अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? जर नसेल, तर त्यांनी बाहेरूनच दर्शन घ्यायला हवे होते. मंदिराचे आणि गर्भगृहाचे काही नियम असतात. राजकीय फायद्यासाठी धार्मिक नियमांचे उल्लंघन करू नका. दर्शन घ्यायचे असेल तर आधी हिंदू धर्म स्वीकारा, असे भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले म्हणाले.
advertisement
काही लोक स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजू लागलेत
सत्तार समर्थकांनीही भाजपच्या आरोपांना उत्तर दिले. काही लोक हिंदू धर्माचे स्वतःला ठेकेदार समजू पाहत आहेत, संकुचित विचारसरणीतून त्यांनी हा प्रकार केला. हा निंदनीय आणि दुर्दैवी प्रकार आहे. हिंदू धर्माची व्यापक संकल्पना आहे. त्यांना आरएसएसच्या कार्यक्रमाला सलमान खान चालतो. मग प्रत्येक जाती-धर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या अब्दुल सत्तारांनी जर मंदिरात दर्शन घेतले असेल तर विरोध का? असा सवाल सत्तार समर्थक शिवसेना पदाधिकारी प्रशांत जोशी यांनी उपस्थित केला.
advertisement
तुषार भोसले कोण शंकराचार्य लागून गेले का?
मंदिर किंवा मशीद ही सार्वजनिक ठिकाणं आहेत. तुषार भोसले कोण शंकराचार्य लागून गेले का? एखादा मुस्लिम माणूस दर्शनाला येत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. भाजप हिंदू धर्माला संकुचित करत आहे, आमचा धर्म व्यापक आहे, असे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 2:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अब्दुल सत्तारांनी महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, भाजप कार्यकर्ते संतापले, गोमुत्र शिपडलं








