अजितदादा राजकारणात नसते तर काय झाले असते? फडणवीसांकडून आठवणींना उजाळा, सांगितलं खास क्षेत्र
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सभागृहात अजित पवारांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला.
आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सभागृहात अजित पवारांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. या शोक प्रस्तावांमधून दोन्ही नेत्यांनी अजित पवारांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. अगदी त्यांच्या आवडी निवडी, सवयी आणि कामाच्या पद्धतीबाबत दोन्ही नेत्यांनी भरभरून सांगितलं.
अजित पवार जर मंत्री झाले नसते, राजकारणात आले नसते तर काय झाले असते? यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून त्यांनी कोणतं क्षेत्र निवडलं असतं, यावर देवेंद्र फडणवीसांनी मत व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी तेच क्षेत्र का निवडलं असतं, हेही फडणवीसांनी सांगितलं.
अजितदादा मंत्री नसते तर काय झाले असते?
advertisement
शोकप्रस्ताव मांडत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अजितदादा मंत्री झाले नसते तर काय झाले असते? असं एकदा विचारण्यात आलं. तेव्हा मी बोलताना म्हटलं अजितदादांमध्ये शिस्त तर पोलिसासारखी आहे, त्यामुळे कदाचित पोलिसात गेले असते. ते हाडाचे शेतकरी आहेत. कदाचित शेतकरी झाले असते. नंतर माझ्या डोक्यात विचार आला, दादा निश्चितपणे बांधकाम इंजिनिअर झाले असते. कारण बांधकाम क्षेत्रात अगदी छोट्याशा छोट्या गोष्टीत जाणं, सरकारी काम उत्तम गुणवत्तेप्रमाणे झालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह असायचा."
advertisement
"सकाळी ६ वाजता ते साईटवर जाणार, सगळ्या आधिकाऱ्यांना बोलवणार, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणार, चुका दुरुस्ती करायला सांगणार, हे काय आहे, ते काय आहे, काय वापरलंय, याची किंमत किती, असे अनेक प्रश्न विचारायचे. म्हणून जी जी बांधकामं दादांच्या देखरेखी झाली, उत्तम झाली. सरकारी बांधकामांचा एक खाक्या असतो, त्या खाक्यातील ती बांधकामं वाटत नाहीत, ती बांधकामं एखाद्या खासगी बांधकामांना लावजवतील अशी आहेत," असंही फडणवीस म्हणाले.
advertisement
...त्याच मेडिकल कॉलेजमध्ये दादांचा मृतदेह न्यावा लागला
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "कधी कधी दुर्दैव काय असतं बघा, दादांनी स्वत: पाठपुरावा करून ज्या मेडिकल कॉलेजची विट अन विट ठेवली, दुर्दैवाने शेवटी त्याच मेडिकल कॉलेजमध्ये दादांचा मृतदेह न्यावा लागला. यापेक्षा दुर्दैवी अजून काय असू शकत नाही, त्यांचा दर्जा आणि सौंदर्य दृष्टी अतिशय चांगली होती. कोविडच्या काळातही अजितदादा पूर्णपणे मैदानात होते."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 1:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा राजकारणात नसते तर काय झाले असते? फडणवीसांकडून आठवणींना उजाळा, सांगितलं खास क्षेत्र










