अजित पवारांची एक खेळी, 3 पक्षात वादाचा भडका, पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे महानगर पालिकेसाठी अजित पवारांनी शरद पवार गटाला साद घातली आहे. पण अजित पवारांच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीत वादाचा भडका उडाला आहे.
राज्यात महानगर पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट अजित पवारांना सोबत घेण्यास तयार नसल्याचं चित्र अनेक ठिकाणी आहे. स्थानिक भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते अजित पवारांना सोबत घेण्यास विरोध करत आहेत. यामुळे दादांना वेगळा पर्याय शोधावा लागत आहे.
पुणे महानगर पालिकेसाठी अजित पवारांनी शरद पवार गटाला साद घातली आहे. ही निवडणूक एकत्र लढण्याच्या दिशेनं दोन्ही पक्षाचे नेते चर्चा करत आहेत. पण अजित पवारांच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीत वादाचा भडका उडाला आहे. अजित पवार गटासह शरद पवार गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामास्त्र उगारलं आहे. त्यांनी पुरोगामी विचारांचा दाखला देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवार गटातील अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते राजीनाम्यावर ठाम राहिले. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
advertisement
मात्र प्रशांत जगताप यांना काँग्रेसमध्ये घेण्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे. प्रशांत जगतापांना काँग्रेसमध्ये घेतल्यास आम्ही भाजपात जाऊ अशी भूमिका काँग्रेस नेते दत्ता बहिरट, अभिजीत शिवरकर आणि आणखी एका माजी नगरसेवकानं घेतलं आहे. काँग्रेस नेत्यांचा हा पवित्रा पाहता आता प्रशांत जगतापांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार का? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
याची दुसरी बाजू अशी सांगितली जात आहे की, महायुतीत सन्मानपूर्ण जागा मिळाव्यात, यासाठी दबाव तंत्र म्हणून अजित पवारांनी शरद पवार गटासोबत जाण्याची खेळी केली होती. पण खेळ शरद पवार गटासह काँग्रेसमध्ये भडका उडवारा ठरत आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास काँग्रेस पक्षही तयार नाही. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने अजित पवारांना रेड सिग्नल दाखवल्याची देखील चर्चा आहे. एकूणच अजित पवारांनी शरद पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने पुण्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 1:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांची एक खेळी, 3 पक्षात वादाचा भडका, पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ











