अजितदादांचा अपघात, अमोल मिटकरींच्या नव्या आरोपांनी राज्यात खळबळ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
संतोष गोरे, प्रतिनिधी, मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघातावरचं संशयाचं आणि प्रश्नांचं काहूर कायम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवारांच्या विमान अपघातावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवे प्रश्न उपस्थित केले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मिटकरींनी पायलट सुसाईड बॉम्बर होता का? अशी शंका उपस्थित केलीय. तर शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनीही याच मुद्यावरून प्रश्नांची सरबत्ती केली.
अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं. पाच दिवसांनी दादांच्या निधनाला एक महिना पूर्ण होईल. मात्र अजूनही दादांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्रातील नागरिक सावरलेले नाहीत. अजित पवारांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरीही अजितदादांच्या निधनामुळे प्रचंड भावुक झालेत. दादांच्या विमानाला झालेल्या अपघातावर अमोल मिटकरी सातत्यानं संशय व्यक्त करताहेत.
अजितदादांचा पायलट सुसाईड बॉम्बर होता का?
advertisement
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अजितदादांचा पायलट सुसाईड बॉम्बर होता का? त्याचा मास्टरमाईंड कोण असे सवाल त्यांनी विचारले.
अमोल मिटकरींनी अजित पवारांचं अपघाती निधन आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या यात साधर्म्य असल्याचा मुद्दा मांडला. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलमनं 21 मे 1999 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबदूरमध्ये आत्मघाती हल्ला करून राजीव गांधींची हत्या केली होती. याच मुद्याच्या अनुषंगानं डीजीसीएच्या अहवालानुसार विमानात सहा जण होते, मग पाचच मृतदेह कसे सापडले? असा मुद्दा अमोल मिटकरींनी उपस्थित केला.
advertisement
तर ब्लॅक बॉक्स जळाला हीच सर्वात मोठी शंका असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. आतापर्यंत काय तपास झाला, असा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला. जर तपास योग्य दिशेने झाला नाही तर माझ्याकडील माहिती मी सार्वजनिक करेल, असे रोहित पवार म्हणाले.
ते दोघे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते?
अजित पवारांच्या विमानाचे पायलट कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते? ते दोघे सध्या कुठे आहेत? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. त्यातच आता अमोल मिटकरींनी सुसाईड बॉम्बरचा गंभीर मुद्या उपस्थित केलाय. त्यामुळे या प्रकरणात सत्य काय आहे? हे अधिकृत चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र निर्माण झालेल्या संशयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 10:06 PM IST







