Ashok Kharat Case: 'अशोक खरातला जे जे भेटले, त्यांची HIV टेस्ट करा', नाशिकमधील प्रकरणावरून विधानसभेत राडा, नेतेमंडळी अस्वस्थ!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या विकृत कारनाम्यांचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. विरोधकांनी अशोक खरात प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं.
मुंबई: इतरांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी तंत्र-मंत्र करण्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात हाच मोठ्या अडचणीत आला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या विकृत कारनाम्यांचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. विरोधकांनी अशोक खरात प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं.
त्या सगळ्यांची एचआयव्ही चाचणी करा...
विधानसभेत बोलताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे? या भोंदू महाराजाचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात अनेक राजकीय नेते, महसूल विभागाचे बडे अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती दिसत आहेत. या सर्वांचे सीडीआर (Call Detail Record) तपासले पाहिजेत. हा बाबा 'अशोक जल' बनवायचा आणि त्यात 'व्हायग्रा' मिसळायचा, असा खळबळजनक दावाही वडेट्टीवारांनी केला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली असून सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. "खरातला जे कोणी भेटले आहेत, त्या सर्वांची सरकारने HIV टेस्ट करावी, अन्यथा राज्यावर मोठे संकट येईल," असा विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
advertisement
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला. "अशोक खरातसोबत ज्या ज्या व्यक्तींचे फोटो समोर आले आहेत, त्या सर्वांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे, त्याच धर्तीवर इतर संशयितांचेही राजीनामे घेतले पाहिजेत," अशी मागणी पटोले यांनी केली.
त्याची लाज वाटली पाहिजे, भास्कर जाधवांचा हल्लाबोल...
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही सरकारवर कडाडून टीका केली. "पुरोगामी महाराष्ट्र म्हणवता आणि अशा भोंदू बुवांचे पाय धुता? तुम्हाला लाज वाटली पाहिजे," अशा शब्दांत त्यांनी टीकेची झोड उठवली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय म्हटले?
अशोक खरातच्या संदर्भात जो विषय घडलेला आहे तो अतिशय गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. या प्रकरणी आजही महत्त्वाचा तपास होणार असल्याचे आपण सभागृहात मंगळवारी सविस्तर निवेदन करू, असे त्यांनी म्हटले. हा विषय गंभीर असून आपण कोणालाही क्लिन चीट देत नाही. मात्र, या प्रकरणात ज्याचा दुरान्वये संबंध असला तरी त्याच्यावर कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: 'अशोक खरातला जे जे भेटले, त्यांची HIV टेस्ट करा', नाशिकमधील प्रकरणावरून विधानसभेत राडा, नेतेमंडळी अस्वस्थ!







