भाजपमध्ये २ गट, महापौरपदासाठी नावाची घोषणा, पण सुमित पाटलांनी दंड थोपटले!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भिवंडी पालिकेत भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले असून काही नगरसेवक सुमित पाटील यांच्यासोबत तर काही नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासोबत बाहेर अज्ञातस्थळी गेले आहेत.
भिवंडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडी पालिका महापौर पदासाठी भाजपचे नारायण चौधरी यांचे नाव शहराध्यक्ष रविकांत सावंत यांना पत्राद्वारे कळविल्याने शहराध्यक्ष रवी सावंत यांनी महापौर पदासाठी नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान त्यांचे अभिनंदनाचे बॅनर समाज माध्यमांवर झळकत शुभेच्छा सुरू असतानाच भाजपकडून महापौर पदासाठी इच्छुक असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील समर्थकांनी सुमित पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली असल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकी आधीच भाजप मध्ये दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
भिवंडी पालिकेत भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले असून काही नगरसेवक सुमित पाटील यांच्यासोबत तर काही नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासोबत बाहेर अज्ञातस्थळी गेले आहेत. त्यामुळे पक्ष श्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती देतात हे पाहणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत नारायण चौधरी यांच्या नावाचे पत्र शहर अध्यक्षांना आले आहे. पण त्यावर जावक क्रमांक नसल्याने या पत्राबाबत सुमित पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.
advertisement
लवकरच राज्यातील पक्षाचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या बाबत दाद मागणार असल्याचे त्यांनी फोनवरून बोलताना स्पष्ट केले आहे. तर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाने अधिकृतपणे माझी नियुक्ती जाहीर केली असून त्या संदर्भातील लेखी पत्र देखील भाजप प्रदेश अध्यक्षांनी दिले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी महापौर पदाच्या नावासाठी माझी अधिकृत घोषणा झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांनी सुद्धा फोन वरून दिली आहे.
advertisement
भाजपकडून महापौर पदासाठी नारायण चौधरी आणि सुमित पाटील हे दोघेही इच्छुक असल्याने याबाबत निर्णय घेण्याची विनंती शहर पदाधिकारी यांच्याकडून प्रदेश कार्यालयाकडे केली होती. भाजप प्रदेश कार्यालयाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणारे लेखी पत्र आमच्याकडे आले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्व मान्य करतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत यांनी दिली आहे.
advertisement
भिवंडी पालिकेत भाजपाचे २२ शिवसेना शिंदे गटाचे १२, एक अपक्ष असे ३५ चे संख्याबळ आहे. बहुमतासाठी आवश्यक ४६ ही संख्या पार करण्यासाठी त्यांना ११ सदस्य कमी आहेत. अशा परिस्थितीत इतर छोट्या गटांची मदत घेतली जाणार असून शहर विकासासाठी सर्व सोबत येतील, असा विश्वास शहराध्यक्ष रवी सावंत यांनी व्यक्त केला आहे.
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 9:08 PM IST









