Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jayakwadi Dam: मराठाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीत मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी नदीवर वसलेले जायकवाडी धरण पाण्याने पूर्ण भरले आहे. . पाणलोट क्षेत्रातील वाढत्या पावसामुळे आज धरणाचे तब्बल 18 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होणार असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडी धरणाचा साठा 95.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात 2 हजार 603 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. वाढती आवक पाहता गुरूवारी सकाळी मुख्य 18 गेट्समधून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
advertisement
शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले की, मागील चार दिवसांपासून धरणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या आवक कमी असली तरी साठा 95 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे मुख्य गेट्स उघडून विसर्ग केला जाईल. यापूर्वीही धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या पावसामुळे आपेगाव, हिरडपुरीसह गोदावरीवरील बंधारे शंभर टक्के भरले आहेत.
advertisement
गोदावरी नदीत विसर्ग
सध्या गोदावरी नदीत विविध धरणांतून विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 22 हजार 530 क्युसेक, गंगापूरमधून 6 हजार 340, मुकणे 1 हजार 655, भावली 2 हजार 324, करंजवण 693 आणि नांदूर मधमेश्वरमधून 9 हजार 465 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
शेतीला फायदा
1973 मध्ये धरणाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर धरणातून आजवर 24 वेळा विसर्ग झाला आहे. यंदाही साठा 95 टक्के झाल्यामुळे दुसऱ्यांदा विसर्ग होणार आहे. शेतीसाठी वाढीव जलसाठ्याचा उपयोग होईल. जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरल्याने रब्बीसाठी 7 आवर्तने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात बागायती शेतीचे क्षेत्र वाढेल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या वेळी पाणी मिळेल. धरणातून विसर्ग झाल्यानंतर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसह विदर्भ, तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना लाभ होईल. नांदेडचा बाभळी बंधारा पूर्णक्षमतेने भरेल. त्यामुळे तेलंगणातही पाणी सोडले जाईल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Aug 21, 2025 8:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा







