दिवाळीत लेकरांना कपडेही घेऊ शकला नाही शेतकरी, संभाजीनगरमध्ये हवालदिल बापाने मृत्यूला कवटाळलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पैठण तालुक्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. इथं एका शेतकऱ्याने ऐन दिवाळीत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. इथं एका शेतकऱ्याने ऐन दिवाळीत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी, लेकरांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. ऐन दिवाळीत अशाप्रकारे शेतकऱ्याने आयुष्य संपवल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांडा इथं घडली.
नामदेव लालसिंग राठोड असं आत्महत्या करणाऱ्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. दिवाळीच्या बाजाराला पैसे नसल्याने त्यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं आहे. त्यांच्या डोक्यावर ८ लाखांचं कर्ज होतं. अलीकडेच मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी, सततची नापिकी आणि सरकारकडून न मिळणारी मदत या सगळ्या कारणांमुळे राठोड यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला होता. अशात दिवाळी सण साजरा करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी आयुष्याचा शेवट केला.
advertisement
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांड्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान, सततची नापिकी, कर्ज अन् दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे नसल्याच्या कारणातून 45 वर्षीय शेतकरी नामदेव लालसिंग राठोड यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अतिवृष्टीने पिकांचं झालेलं नुकसान, सततची नापिकी, बँकांचे घेतलेले पीककर्ज आणि लोकांची उसणवारी, त्यात शासनाची अतिवृष्टीची मदतही नाही.
advertisement
अशात दिवाळीत लेकराबाळांसह घरच्यांना कपडे आणि इतर साहित्य कसं खरेदी करावं, या विवंचनेत राठोड होते. त्यामुळे त्यांनी आपल्या घरासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नामदेव राठोड यांनी अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 23, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दिवाळीत लेकरांना कपडेही घेऊ शकला नाही शेतकरी, संभाजीनगरमध्ये हवालदिल बापाने मृत्यूला कवटाळलं