शिवकालीन धोप तलवार अन् दुर्मिळ वस्तूंचा खजिना, संभाजीनगरचं संग्रहालय पाहिलं का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ऐतिहासिक संग्रहालय असून या ठिकाणी शिवकालीन दुर्मिळ वस्तूंचा खजिना आहे. शिवराज्याभिषेक दिनी या संग्रहालयाला भेट देऊ शकता.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन राज्यात 6 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आवर्जून रायगड आणि इतर शिवकालीन किल्ल्यांना भेट देतात. तसेच काहींचा ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयात जावून शिवकालीन वस्तू पाहण्याकडे कल असतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये असंच एक ऐतिहासिक वस्तू संग्रहालय असून या ठिकाणी शिवकालीन दुर्मिळ वस्तूंचा खजिना आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालयाबाबत संचालक डॉक्टर शांतीलाल पुरवार यांनी माहिती दिलीय.
advertisement
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक दुर्मिळ वस्तू आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सैनिक ज्या तलवारी वापरायचे त्या तलवारींचा संग्रह याठिकाणी करण्यात आलंय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज वापरत असलेली धोप तलवार या या संग्रहालयाचं आकर्षण आहे. शिवकालीन विविध हत्यारे यात जांबिया, करवाल, खंजिर, सुरा, बिछवा आदी प्रकार या ठिकाणी आहेत. त्या सोबतच मुल्हेरी तलवार, मेवाडी तलवार, तेगा तलवार, सैफ तलवार, सिरोही तलवार अशा तलवारीचे प्रकारही याठकिाणी पाहता येतील.
advertisement
संग्रहालयात विविध दालन
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात विविध वस्तूंचे दालन आहेत. यात शस्त्रास्त्रांसह इतर दुर्मिळ मूर्ती, भांडी, नाणी आदींचा संग्रहही आहे. वाघ नखे, चिलखत, भाले, त्या काळामध्ये जे सैन्य बंदुकी आणि पिस्तुल वापरत होते ते देखील या ठिकाणी आहेत. यामध्ये बंदुकीची नळी, घोडेदार बंदूक, तमंचा या बंदुकी आहेत. त्यासोबतच या ठिकाणी दोन मोठ्या तोफा देखील ठेवण्यात आल्या आहेत. दुर्मिळ नाणी, मूर्ती, भांडी यांसोबत त्या काळात खेळल्या जाणाऱ्या खेळांचे सारीपाठ आणि इतर वस्तूही इथे पाहता येतील, असे पुरवार सांगतात.
advertisement
शिवराज्याभिषेक दिनी आपण छत्रपती संभाजीनगर येथील या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाला भेट देऊ शकता. इथे शिवकाळातील अनेक दुर्मिळ वस्तूंचा खजिना पाहता येईल.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 05, 2024 5:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
शिवकालीन धोप तलवार अन् दुर्मिळ वस्तूंचा खजिना, संभाजीनगरचं संग्रहालय पाहिलं का?