नवीन नागपूरमधील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडणार, CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Cm Devendra Fadanvis: नागपूर महानगर प्राधिकरणाच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
मुंबई: नवीन नागपूरमधील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडण्यात यावे. तसेच हा बाह्यवळण मार्ग भविष्यात मल्टिमॉडल कॉरिडॉरमध्ये रुपांतरित करण्यासाठी आतापासूनच त्यामध्ये योग्य ती तरतूद करून ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या असलेल्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र असेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची दहावी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मीना, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
आज झालेल्या बैठकीत नागपूर महानगर प्रदेश हद्दीतील वाहतूक व्यवस्थापन करणे, सार्वजनिक व खासगी वाहतुकीत सुसूत्रता आणणे, वाहतुकीच्या नवीन व फिडर मार्गाची निर्मिती करणे यासाठी स्वतंत्र नागपूर महानगर परिवहन उपक्रम कंपनीची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच यावेळी नागपूर महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे, नागपूर जेलसाठी जागा हस्तांतरित करणे, प्राधिकरणात सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडणे, दीक्षाभूमीचे उर्वरित काम पूर्ण करणे, प्राधिकरणाचा 156 पदांचा सुधारित आकृतीबंध, नागपूर महापालिका क्षेत्रातील प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी नागपूर सुधार प्रन्यासला कार्यान्वयिन यंत्रणा म्हणून नियुक्ती करणे यासह एकूण 21 विषयांना मान्यता देण्यात आली.
advertisement
नवीन नागपुरातील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडावे
नवीन नागपूरमधील संपर्क रस्त्यांची जोडणी चांगली व्हावी, यासाठी तेथील रस्ते मोठे असावेत, त्याप्रमाणे त्याची आखणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
नागपूर ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मीना यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 20, 2025 9:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवीन नागपूरमधील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडणार, CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय