BREAKING: मुंबई-गोवा हायवेवर थरार, भरधाव टँकरमधून गॅस गळती, चालकाने...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री गॅस गळतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे.
राजेश जाधव, प्रतिनिधी रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री गॅस गळतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे नजीक दहिवली फाट्याजवळ सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. सुदैवाने, टँकर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि पहाटेची वेळ असल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजी गॅस वाहून नेणारा एक टँकर मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना अचानक त्यातून गॅसची गळती सुरू झाली. सावर्डे परिसरातील दहिवली फाट्याजवळ आल्यावर चालकाच्या ही बाब लक्षात आली. टँकरमधून गॅस वेगाने बाहेर पडत असल्याचे पाहून चालकाने क्षणाचाही विलंब न लावता टँकर महामार्गावर सुरक्षित ठिकाणी उभा केला आणि तातडीने खाली उडी घेतली.
advertisement
परिसरात पांढऱ्या धुराचे लोट
बघता-बघता गॅस गळतीचं प्रमाण इतकं वाढलं की, काही वेळातच संपूर्ण परिसरात पांढऱ्या धुराचे लोट पसरले. हा गॅस अतिशय ज्वलनशील असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास घडली. या काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ अत्यंत कमी असते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर ही घटना दिवसा गजबजलेल्या ठिकाणी घडली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
advertisement
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणेनं घटनास्थळी धाव घेतली. चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही आग लागली नाही किंवा स्फोट झाला नाही, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या घटनेमुळे महामार्गावरून होणाऱ्या धोकादायक वायू आणि इंधन वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 10:29 AM IST









