धनंजय मुंडे वि. मनोज जरांगे संघर्ष पेटणार, अडीच महिन्यानंतर दिलं खुलं आव्हान
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आजवर मुंडेंनी जरांगे पाटलांवर हातचं राखून टीका केली होती. पण आता मुंडेंनी थेट जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे.
गेली अनेक दिवस गप्प असलेल्या धनंजय मुंडेंनी आपलं मौन सोडलंय. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यातून गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या जरांगेंच्या टीकेला उत्तर दिलंय. त्यामुळे मुंडे विरुद्ध जरांगे हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ओबीसी महाएल्गार सभेतून मनोज जरांगे पाटलांवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. खरं तर आजवर मुंडेंनी जरांगे पाटलांवर हातचं राखून टीका केली होती. पण आता मुंडेंनी थेट जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली होती. तसेच नुकतेच झालेल्या दसरा मेळाव्यातही जरांगे पाटलांनी मुंडेंवर निशाणा साधला होता. त्याची परतफेड मुंडेंनी आपल्या भाषणात केली. धनंजय मुंडे म्हणाले की, दोन अडीच महिने गप्पच होतो. ओबीसीत का यायचं आहे तर मूठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं आहे, यांना पेटवायचं आहे. पेटवून पेटवून काय म्हणतो. कधी कधी माणूस असण्याची, जिवंत असण्याची हे ऐकून कसं सहन करावं याची मनाला भीती वाटते.
advertisement
मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं आणि माझं काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासून पाडीतोच म्हणतो. भुजबळ साहेबांनाही म्हणतो, पाडीतोच. अरे 1 लाख 42 हजार मतांनी आलो. पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतो. आज आपल्या ओबीसींचं आरक्षण न्याय हक्कासाठी हा एल्गार मोर्चा आहे. आपल्या हक्काचं आरक्षण कुणाला देऊ द्यायचं नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
advertisement
मुंडेंच्या टीकास्त्रामुळे वादाचा भडका उडाला नाही तरचं नवलं. आता हा वाद शिंगावर घेण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील हे एकच जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यातला वाद काही लपून राहिला नाही. आता ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं या संघर्षाला चांगलीच धार आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2025 11:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडे वि. मनोज जरांगे संघर्ष पेटणार, अडीच महिन्यानंतर दिलं खुलं आव्हान