गावची तहान भागवणारा जलदूत, सिद्धेश्वर यांच्या या निर्णयाला कराल सलाम, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला तेव्हा गावातीलच सिद्धेश्वर सावंत हे जलदूत बणून पुढे आले.
धाराशिव, 19 नोव्हेंबर: यंदा मराठवाड्यात पाऊस कमी झाल्याने ऐन दिवाळीच्या आधीपासूनच जलसंकट निर्माण झाले आहे. विविध ठिकाणी असणारे जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. धाराशिव जिल्ह्यातील वालवड हे 5 हजार लोकवसतीचं गाव आहे. गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला होता. तेव्हा गावातीलच सिद्धेश्वर सावंत हे जलदूत बणून पुढे आले आणि त्यांनी स्वत:च्या बोअरवेलचं पाणी गावाला दिलं. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे.
पाणीटंचाईच्या काळात जलदूत धावून आला
धाराशिव जिल्ह्यात या वर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडलाय. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातच वालवडकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी सिद्धेश्वर सावंत हे जलदूत म्हणून गावाच्या मदतीला धावून आले आहेत. गावाशेजारील त्यांच्या बोअरवेल वरून ते गावाला पाणीपुरवठा करतात. गावातील घरासमोरून पाईप नेण्यात आले आहेत. प्रत्येक जण आपलं पाणी भरून झाल्यानंतर पुढच्या घराकडे पाणी भरण्यासाठी पाईप दिला जातो. अशा पद्धतीने प्रत्येक घरी पाणी भरले जाते.
advertisement
ग्रामपंचायतची होतेय मदत
पाणी भरण्यासाठी घरी कोणी नसेल तर ग्रामपंचायत कर्मचारी पाणी भरून देतात. एप्रिल 2023 पासून ते आत्तापर्यंत सिद्धेश्वर सावंत यांच्याकडून निशुल्कपणे वालवड गावासाठी पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.
गावाबाहेरील लोकांना निःशुल्क पाणीपुरवठा
वालवड गावाला शासनाकडून जलजीवन मिशन अंतर्गत मात्रेवाडी साठवण तलावातून 7.5 कोटी रुपयांची योजना मंजूर असून या योजनेचे कामही चालू आहे, असे उपसरपंच सांगतात. मात्र, सध्या पाणी टंचाई आहे. गावातील आणि गावाबाहेरील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे गावाबाहेर राहणाऱ्या लोकांनी पाण्याची मागणी केल्यास सावंत हे स्वतःच्या टेम्पोमधून निशुल्कपणे त्या घरी पाणी पोहोच करतात. त्यासाठी त्यांना वालवड येथील तरुणांची साथ मिळते.
advertisement
अशीही माणुसकी
सध्या कांद्याचे बाजार भाव तेजीत आहेत. गावातील उमेश ढगे यांच्या कांदा पिकाला पाणी कमी पडले. पीक पाण्याविना करपू लागले. त्यावेळी सिद्धेश्वर सावंत यांनी रात्रीच्या वेळी कांद्याच्या पिकाला पाणी दिले. जेणेकरून ढगे यांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कांदा पिकातून उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकाला काहीच कमी पडत नाही हेच यातून पाहायला मिळते.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 19, 2023 7:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
गावची तहान भागवणारा जलदूत, सिद्धेश्वर यांच्या या निर्णयाला कराल सलाम, Video