तुमच्या घरातलं मीठ आयोडिनयुक्त आहे का? छ.संभाजीनगर पालिकेकडून का होते तपासणी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आपल्या जेवणातील मीठ शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, पण ते मीठ खरंच आयोडिनयुक्त आहे का, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हाच निष्काळजीपणा पुढे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो.
छत्रपती संभाजीनगर: आपल्या जेवणातील मीठ शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, पण ते मीठ खरंच आयोडिनयुक्त आहे का, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हाच निष्काळजीपणा पुढे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संपूर्ण जिल्ह्यात “आयोडिनयुक्त मीठ तपासणी मोहीम” सुरू केली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आयोडिनची कमतरता हा ‘सायलेंट डिसीज’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लहान मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासावर परिणाम होतो, महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत निर्माण होते, तसेच गलगंड आणि थायरॉईडचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक घरात आयोडिनयुक्त मिठाचा वापर होत आहे का, हे तपासण्यासाठी पुढील 15 दिवसांत घरांमधून, शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमधून मिठाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मूत्रनमुने घेऊन त्यावरही परीक्षण केले जाणार आहे.
advertisement
या मोहिमेत आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. तपासणीसाठी आरोग्य विभागाने दोन ते तीन हजार किट वितरित केल्या असून, प्रत्येक किटमधून 50 नमुने तपासले जाऊ शकतात. संशयास्पद नमुन्यांची सखोल तपासणी प्रयोगशाळेत केली जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन ‘आयोडिन अभावमुक्त समाज’ तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या सूचनेनुसार 14 ते 28 ऑक्टोबरदरम्यान ही जनजागृती मोहीम राबवायची होती, मात्र दिवाळी सुटीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर 28 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात डॉ. धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली मोहिमेचा शुभारंभ झाला.
Location :
Maharashtra
First Published :
November 04, 2025 9:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुमच्या घरातलं मीठ आयोडिनयुक्त आहे का? छ.संभाजीनगर पालिकेकडून का होते तपासणी

